मुंबई: अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या व्यक्ती, आस्थापना यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 272 व 273 मध्ये दुरुस्ती सुचविण्यात आली असून या दुरुस्तीनुसार आता अशा प्रकारचे गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र करण्यात येणार आहेत. यासाठी आजन्म कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट बापट यांनी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
दूध भेसळ तसेच अन्न पदार्थांमध्ये भेसळ झाल्यास ते मानवी आरोग्यासाठी अपायकारक आहे. अशा प्रकरणी शासन अत्यंत संवेदनशील असून अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या व्यक्ती किंवा आस्थापना यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे श्री. बापट यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
विधानपरिषद सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. बापट बोलत होते. राज्यात 1 एप्रिल 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत दुधाचे एकूण 604 नमुने विश्लेषणासाठी घेतले असून त्यापैकी 302 प्राप्त अहवालामध्ये 219 नमुने प्रमाणित घोषित झाले. तर 83 नमुने कमी दर्जाचे घोषित झाले असून एकही नमुना असुरक्षित आढळून आलेला नाही. कमी दर्जाच्या नमुन्यासंदर्भात कारवाई करण्यात येत असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य, हेमंत टकले, डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
Published on: 23 November 2018, 10:57 IST