देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एक यशस्वी पाऊल म्हणून २९ मे पासून देशभरात एकाच वेळी विकसित कृषी संकल्प अभियान केंद्र शासनातर्फे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असून, या अभियानाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ तालुक्यात यशस्वीतेची जबाबदारी एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली यांच्याकडे देण्यात आली आहे.
यादरम्यान २९ मे ते १२ जून या कालावधीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ, परभणी कृषि विद्यापीठाचे अधिकारी/कर्मचारी, आत्मा व कृषि विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी व कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ, इफकोकंपनीचे कर्मचारी, शेतकरी तुपादक कंपनीचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी वर्तमान शेतीतील विकासासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन जिल्ह्यातील विविध गावातील शेतकर्यांना करणार आहेत.
या शेती आणि शेती विकासाशी संबंधित विकसित कृषी संकल्प अभियानात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख काकासाहेब सुकासे यांनी केले आहे.
या अभियानादरम्यान प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, जैविक खते व कीडनाशकाचा संतुलित वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, कृषी तंत्रज्ञान, ड्रोन प्रात्यक्षिके, बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके, केंद्र व राज्य शाशानाच्या विविध योजना आदि अनेक बाबींवर सखोल आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषि विज्ञ केंद्राचे दोन पथके दररोज ३ गावांना भेटी देणार आहेत. भारत सरकारतर्फे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतातः मात्र काही योजनांची व्यवस्थित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास अवधी लागतो. ही अडचण या अभियानाच्या माध्यमातून दूर होणार असून यादरम्यान भारत सरकारच्या संपूर्ण योजनांची माहिती शेतकऱ्यांना त्याच्या गावात जाऊन देण्यात येणार आहे.
Published on: 28 May 2025, 03:24 IST