भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामुळे मानवी आरोग्यसमवेतच पिकांचे आरोग्य देखील धोक्यात येणार आहे. या अनुषंगाने भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा आणि महत्वपूर्ण सल्ला दिला आहे.
संस्थेच्या कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले की, आगामी काळात उष्णतेची लाट व वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला, भाजीपाला रोपवाटिका, उन्हाळी पिके, फळबागांना नियमित अंतराने अल्पशा प्रमाणात पाणी देत राहणे महत्त्वाचे आहे. रोपवाटिका आणि झाडांना उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी इनहिबिटरचा वापर करण्याचा सल्ला दिला गेला आहे.
धान्य साठवणुकीत ठेवण्यापूर्वी साठवणगृहाची साफसफाई करून घ्यावी. याशिवाय धान्य चांगले वाळवुन साठवणूक करावे. कचरा जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टोअर हाऊसच्या छतावर, भिंतींवर आणि जमिनीवर एक भाग मॅलाथिऑन 50 EC 100 भाग पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा देखील सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
जुन्या गोण्या शेतीमाल साठवण्यासाठी वापरावयाच्या असल्यास त्या गोण्या एक भाग मॅलेथिऑन आणि 100 भाग पाण्यात मिसळून 10 मिनिटे भिजवून सावलीत वाळवाव्यात, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असल्याने काढणीसाठी तयार गव्हाचे पीक काढून घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. एवढेच नाही शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके बांधून ठेवावीत, अन्यथा जोरदार वारा किंवा वादळामुळे पीक शेतातून उडून जाण्याचा धोका आहे. मळणी केल्यानंतर आणि धान्य साठवण्यापूर्वी चांगले वाळवावे असे शास्त्रज्ञांकडून सांगितले गेले आहे.
ज्या शेतकरी बांधवांना उन्हाळी मुगाची पेरणी करायचे असेल त्यांनी पुरेसा ओलावा असलेल्या शेतात याची पेरणी करावी. मूग पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी बांधवांनी सुधारित बियाणे वापरावे असा सल्ला यावेळी दिला गेला आहे. यासाठी पुसा विशाल, पुसा रत्न, पुसा ५९३१, पुसा बैसाखी, पीडीएम-११, एसएमएल-३२, एसएमएल-६६८ आणि सम्राट या जातीचे बियाणे पेरण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांवर विशिष्ट रायझोबियम आणि फॉस्फरस विरघळणारे जीवाणू यांची प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी शेतात पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या:-
अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना कलिंगड पिकाने दिली नवसंजिवनी; मिळवलं लाखोंचं उत्पन्न
Published on: 03 April 2022, 10:47 IST