गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात थंडीची लाट आहे. यामुळे बहुतांशी भागात हुडहुडी वाढली असून किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबई, पुण्यासह नाशिकही गारठले आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ९.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस असल्याची नोंद हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
पहाटेच्या गारव्यामुळे मुंबईककरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे. दिवसभर ऊन पडत असले तरी सांयकाळी हवेत गारवा तयार होत आहे. मध्य रात्रीनंतर गारवा वाढत जाऊन पहाटे कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऊब मिळवण्यासाठी शेकोट्याचा आधार घेऊ लागली आहे. येत्या काही दिवसात थंडीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.सध्या उत्तरेकडील थंड वारेचे प्रवाह मराठवाडा व विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.
निफाड येथे ९अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.कोकणातही थंडी वाढल्याने किमान तापमान १७ अंश सेल्सिअस पर्यंत आले आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात गारठला आहे. पुण्यासह नाशिकमध्ये थंडीने कहर केला असून गेल्या ४ दिवसांपासून पुणे आणि नाशिकचे किमान तापमान सातत्याने १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तर मुंबईचे किमान तापमान २२ ते १९ अंश नोंदविण्यात येत आहे. तर महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर पाहयला मिळण्याची शक्यता आहे. सांगली, नांदेड, उस्मानाबाद, मालेगाव, सातारा, बारामती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जालना येथील किमान तापमान १५ अंशाखाली घसरले आहे.
Published on: 12 November 2020, 11:21 IST