1. बातम्या

कृषिमालाच्या विक्रीव्यवस्थेसाठी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सामंजस्य करार

KJ Staff
KJ Staff

महाराष्ट्र आणि पंजाब राज्यातील विविध कृषिमाल तसेच कृषी प्रकिया मालाची परस्परांच्या विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून विक्रीचे जाळे उभारण्यासंदर्भात तीन सामंजस्य करार आज येथे करण्यात आले. पणनमंत्री सुभाष देशमुख आणि पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

महाराष्ट्र पणन महासंघाचे (महामार्कफेड) आणि पंजाब मार्केटिंग फेडरेशन (मार्कफेड), विदर्भ पणन महासंघ आणि पंजाब मार्कफेड तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि पंजाब मार्कफेड यांच्यात हे सामंजस्य करार करण्यात आले. राज्यातील सहकारी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासन अटल महापणन विकास अभियान राबवत आहे. त्याचा एक भाग म्हणून आयोजित बैठकीत हे करार करण्यात आले. पंजाबमधील आमदार हरप्रतापसिंग अंजाला, पंजाब मार्कफेडचे अध्यक्ष अमरजीतसिंग समरा, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार,पंजाबच्या सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव डी. पी. रेड्डी, राज्याचे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, महामार्कफेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसे,विदर्भ पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, पंजाब मार्कफेडचे व्यवस्थापकीय संचालक वरुण रूजम, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बी. एम. शर्मा, महामार्कफेडचे  अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पाहिनकर आदी यावेळी उपस्थित होते.

पंजाब मार्कफेडच्या सोहना या कृषिप्रक्रिया उत्पादनांचे नाव देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. उत्तर भारतात या ब्रॅंडला खूप चांगली मागणी आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये असलेली सेंद्रीय गूळ, हळद पावडर, ज्वारी, बाजरी, इंद्रायणी, श्रीराम, वाडा कोलम आदी तांदळाच्या जाती, हिमरु शाल, मालवणी मसाला, काबुली चना, लातूर डाळ, केळीचे वेफर्स आदी पदार्थांची चव देशात वैशिष्ट्यपूर्ण अशी असते. या पदार्थांचे ब्रँडिंग करुन पंजाब मार्कफेडच्या मॉलमधून विक्री करण्यास मोठा वाव आहे. तसेच पंजाबच्या सोहना या ब्रँडसह अन्य उत्पादने महामार्कफेड आणि विदर्भ पणन महासंघाच्या विक्री केंद्रातून विक्रीसाठी मोठी संधी आहे. त्यादृष्टीने या कराराचे महत्त्व लक्षात येते.

यावेळी श्री. देशमुख म्हणाले की, परस्परांच्या राज्यातील कृषीमाल तसेच कृषी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीचा व्यवस्था निर्माण केल्यास दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळू शकेल. पंजाब राज्य कृषीच्या बाबतीत देशामध्ये अग्रगण्य आहे. तसेच तेथील शासनाच्या पणन महासंघामार्फत कृषीमालावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. पंजाबने केलेल्या ब्रँडिंगच्या पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील कृषिप्रक्रिया व ब्रँडिंगसाठी करण्यास इच्छुक आहोत. त्यासाठी पंजाबने सहकार्य करावे.

ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये महामार्कफेड आणि विदर्भ पणन महासंघाची विक्री केंद्रे आहेत. त्या माध्यमातून पंजाबमधील कृषिप्रक्रिया केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचप्रमाणे पंजाब मार्कफेडच्या मॉलमधूनही महाराष्ट्राच्या कृषी आणि कृषिप्रक्रिया मालाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters