News

रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ व श्रीवर्धन येथील पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

Updated on 12 June, 2025 6:00 PM IST

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्याप्रसाद’ (तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी तातडीने केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करतानाच पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मंजुरीचे टप्पे पूर्ण करून तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन येथील पर्यटन विकास आरखड्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव .पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ श्रीवर्धन येथील पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या बैठकीत श्री हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास सौंदर्यीकरण, तसेच मारळ येथे प्रस्तावित स्टार गेजिंग (आकाश निरीक्षण केंद्र) या दोन्ही प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. हरिहरेश्वर प्रकल्पासाठी अंदाजे 22 कोटी 66 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच मारळ येथील प्रस्तावित स्टार गेजिंग सुविधा ही रायगड जिल्ह्यातील पहिली प्रगत खगोल निरीक्षण केंद्र असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 25 कोटी 6 लाख रुपये इतका अपेक्षित आहे. याअंतर्गत पर्यटकांना पारदर्शक गेस्ट डोम्स, कॅम्पिंग, साहसी खेळ, व्याख्यान केंद्र, आणि वनसंपदेसह पर्यटनाचा एकत्रित अनुभव घेता येणार आहे.

पर्यटन विकासाच्या या आराखड्यामुळे रायगड जिल्ह्यातील अध्यात्मिक, निसर्ग, खगोल पर्यटनाला नवे बळ मिळेल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

English Summary: Meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar for tourism development of Shri Harihareshwar Maral Shrivardhan in Raigad district
Published on: 12 June 2025, 06:00 IST