News

अक्षय तृतीया हा उत्सव भारतीय संस्कृतीमधील कृषी संस्कृतीशी नाते जोडणारा उत्सव होय. गुढीपाडव्याला शेतीमधील कामांची मशागत सुरू होते आणि *अक्षय तृतीयेच्या दिवशी धूळ पेरणी केली जाते.*

Updated on 14 May, 2021 3:52 PM IST

अक्षयतृतीया हा उत्सव भारतीय संस्कृतीमधील कृषी संस्कृतीशी नाते जोडणारा उत्सव होय. गुढीपाडव्याला शेतीमधील कामांची मशागत सुरू होते आणि अक्षयतृतीयेच्या दिवशी धूळ पेरणी केली जाते. म्हणजे शेतीमधील पूर्वतयारी आणि पेरणीची पर्वणी यातील सुवर्णधागा प्रकट करतो, तो उत्सवाचा दिवस म्हणजे अक्षयतृतीया होय. भारतीय संस्कृतीची महानता ही आहे की, आपण आपल्या बळीराजाच्या हिताचा व कल्याणाचा विचार करून सण व संस्कृती उत्सवाचे नियोजन केले आहे.

अक्षयतृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षयतृतीया येते. हा पेरणीचा मुहूर्त असून ऐश्‍वर्य व संपन्नता आणणारा मुहूर्त आहे. या दिवशी पेरणी केल्यास धनधान्याची विपुलता होते, असा समज प्राचीन काळापासून रूढ आहे व तो गतकालीन इतिहास व अनुभवाने सिद्ध केलेला आहे.

*शेतीसंबंधीच्या परंपरा*

अक्षयतृतीयेच्या इतिहासात डोकावले असता, अनेक आख्यायिकांचे गुंफण त्याभोवती झाले आहे. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करण्यात येते. मातीत आळी घालणे व पेरणी या प्रक्रिकेस या दिवशी प्रारंभ होतो. अक्षयतृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत करण्याचे काम अक्षयतृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. थोडक्यात काय, तर मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खतमिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे होय. बळीराजा आपल्या काळ्या आईची सेवा करताना ही मशागत मोठ्या निष्ठेने करीत असतो. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. *खासकरून महाराष्ट्रातील कोकण भागात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धारणा आहे. अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे. वनौषधींच्या आधारे आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड करून नव्या जगावर भारतीय आरोग्य पद्धतीचा प्रभाव टाकण्याचा आपण पुनश्‍च संकल्प केला पाहिजे.

*पारंपरिक संदर्भ व नवा अर्थ*

अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. *या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.* अक्षयतृतीया या उत्सवाचे पारंपरिक संदर्भ लक्षणीय आहेत. त्यामागे इतिहास, परंपरा व विज्ञान याचा मनोज्ञ संगम घडून आला आहे. या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती साजरी केली जाते. तसेच इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसते की, या *दिवशी परशुराम जयंती, बसवेश्‍वर जयंती आणि हयग्रीव जयंतीही विशेषत्वाने साजरी केली जात असते* या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो.

 

महर्षी व्यासांनी श्री गणेशाच्या साह्याने महाभारतासारखे महान काव्य रचले त्याप्रमाणे वर्तमान युगातही नव्या ज्ञानरचना या पवित्र दिवसाच्या शुभमुहूर्तावर केल्या पाहिजेत, असा आग्रह धरला जातो, तो सार्थ होय. याचा अर्थ असा की,  अक्षयतृतीयेच्या शुभदिनी भारताने ज्ञानयुगात प्रवेश केला व उभ्या विश्‍वाच्या इतिहासावर भारतीय ज्ञान परंपरेचा ठसा उमटविला भारतामध्ये चारीधाम यात्रेत बद्रिकेदार या देवस्थानास विशेष महत्त्व आहे. जन्माला आलेला प्रत्येक भारतीय या बद्रिकेदाराचे दर्शन घेऊन धन्य होतो. परंपरा असे सांगते की, *या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रिनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात* हे मंदिर अक्षयतृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. याचा अर्थ असा की, या पवित्र देवस्थानाचे अक्षयतृतीयेस खुले झालेले दरवाजे हे प्रत्यक्ष दीपावलीच्या पाडव्यापर्यंत खुले असतात.

नरनारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते, असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते आणि त्याच्या क्षात्र तेजाला नमन केले जाते. परशुरामाचा हा अवतार अक्षयतृतीयेच्या शुभ दिवशी उदयास आला, असे मानले जाते. तसेच मध्ययुगात विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समता व बंधुत्वाचा संदेश देणार्‍या महात्मा बसवेश्‍वरांचा जन्मसुद्धा अक्षयतृतीयेच्या दिवशी झाला. आपल्या परंपरेतील दोषांविरुद्ध बंड करावयाचे आणि मुख्य प्रवाहाशी भक्कम दृढतर नाते ठेवायचे, हा आपल्या सुधारणांचा आत्मा होय. दोषांचे निदार्र्लन आणि प्रगतीचा व परिवर्तनाचा पुनरुच्चार हा आपल्या परंपरेचा मध्यवर्ती धागा होय. तो अक्षयतृतीयेने जपला आहे. अक्षयतृतीयेच्या शुभदिनी आणखी काही संदर्भ लक्षात घेण्यासारखे आहेत. *वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. भारतीय पुरातत्त्व विद्येतील मूर्ती विज्ञानाचे काही अद्भूत व अनाकलनीय संकेत आहेत. त्यापैकी हा होय.

 

शेतकरी बंधूंनो,अशा प्रकारे आपली भारतीय संस्कृती समृद्ध व संपन्न आहे. आपण आपल्या उत्सवातून सांस्कृतिक परंपरेचा हा ठेवा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिला आहे, याची नोंद मा. स. गोळवलकर यांनी ‘आपले उत्सव’ या पुस्तकात केली आहे. *अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून निश्‍चित फलनिष्पत्ती देणारा एक पवित्र दिवस होय, असे मानले जाते.* या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय’ (न संपणारे), कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. आजच्या शुभदिनी ज्ञान, विज्ञान व संस्कृतीची पूजा करणे व आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता भाव प्रकट करणे, हाच खरा या उत्सवाचा संदेश होय.

( लेखक - डॉ.वि.ल. धारूरकर)
प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Meaning of Akshay tritiya its importance in Indian agricultural life
Published on: 14 May 2021, 03:51 IST