राज्यात अनेक शेतकरी फुलशेतीच्या माध्यमातून दर्जेदार उत्पन्न पदरी पाडत आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका गेल्या काही वर्षांपासून फुलशेतीसाठी विशेष ओळखला जात आहे. सध्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी लगबग करताना बघायला मिळत आहेत. तालुक्यात सर्वात जास्त गुलाब फुलाची शेती केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण उत्पादनापैकी सर्वात जास्त फुलांचे उत्पादन मावळ तालुक्यात घेतले जाते. एकट्या मावळ तालुक्यात सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाऊस केले गेले आहे, या एवढ्या मोठ्या पॉलिहाऊस क्षेत्रात सर्वात जास्त उत्पादन हे फुलांचे घेतले जाते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे सव्वादोनशे हेक्टर पॉलिहाऊस क्षेत्रावर फुलांची शेती केली जात आहे. आणि यात प्रामुख्याने गुलाबाची लागवड केली जाते.
तालुक्यातील गुलाब मोठ्या प्रमाणात देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो, फक्त देशांतर्गत येणाऱ्या बाजारपेठेतच तालुक्यातील गुलाब पाठवले जातात असे नाही तर त्याची रवानगी फॉरेन मध्ये देखील केली जाते. या गुलाबांची बारामाही मागणी असते, मात्र व्हॅलेंटाईनडेज मध्ये या फुलांना विशेष मागणी असते. तालुक्यातील गुलाब जपान इंग्लंड हॉलंड ऑस्ट्रेलिया दुबई फ्रान्स यांसारख्या विकसित देशात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवला जातो. साधारणता तीस जानेवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान तालुक्यातील गुलाबाचे फुल फॉरेन मध्ये निर्यात केले जातात. या निर्यातक्षम गुलाबाला सुमारे दहा रुपयापासून ते पंचवीस रुपये प्रति फूल पर्यंत दर प्राप्त होतो.
तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी, निर्यातक्षम फुलांची शेती करण्यासाठी दोन महिने अगोदरच तयारी करत असतात. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुलाबाच्या फुलांची कटिंग व बडीग केली जाते. फुलाच्या योग्य वाढीसाठी नाना प्रकारची औषधांची मात्रा दिली जाते, तसेच फुलांवर रोगाचे सावट आले असता महागड्या औषधांची फवारणी देखील शेतकरी बांधव करत असतात. फुलांची कॉलिटी सुधारण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला जातो. साधारणता जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा यादरम्यान गुलाबाची फुले विक्रीसाठी तयार केली जातात.
तालुक्यातील शेतकरी प्रति एकर 40 हजार निर्यातक्षम फुले उत्पादित करीत आहेत. असे असले तरी या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे येथील फूल उत्पादक शेतकरी सांगत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाव्हायरस मुळे फुलांना चांगला बाजारभाव प्राप्त होत नव्हता मात्र या हंगामात फुलांना समाधान कारक बाजार भाव मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल आहे.
Published on: 29 January 2022, 05:00 IST