देशात काळाच्या ओघात शेती क्षेत्रात मोठे अमुलाग्र बदल बघायला मिळत आहेत, आता शेतीतील सर्वच कामासाठी आधुनिक यंत्राचा वापर बघायला मिळत आहे. शेतीची पूर्वमशागत असो कि शेतमालाची काढणी शेतीमधील ए टू झेड कामे आता यंत्राद्वारे केली जात आहेत. आता अल्पभूधारक शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची कार्य करीत आहे. अशी परिस्थिती असली तरीदेखील शेतकरी राजा आपला वर्षानुवर्षाचा सोबती बैलाला कधी विसरू शकत नाही.
असे सांगितले जाते की, ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला बैलं नाहीत तो खरा शेतकरी नाही. याचाच खरा प्रत्यय समोर आला आहे तो अमरावती जिल्ह्यातुन. अमरावती जिल्ह्यातील मौजे शिरसगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नाची वरात चक्क बैलगाडी मधून काढली आहे. या शेतकऱ्याने इंधन दरवाढीचा निषेध म्हणून हा आगळा वेगळा उपक्रम केल्याचे सांगितले जात आहे. मात्र यातून शेतकऱ्याचे आणि बैलांचे अतूट नाते जगासमोर मांडले गेले आहे. या शेतकऱ्याचा वाखाण्याजोगा उपक्रम सध्या जिल्ह्यात मोठा चर्चेचा विषय आहे.
अमरावती जिल्ह्यातील मौजे शिरजगाव ते अनकवडी असे दहा किलोमीटर अंतर सर्व वऱ्हाडी लोकांनी बैलगाड्यातून पार केले. शेतीमध्ये दिवसेंदिवस उत्पादनात घट बघायला मिळत आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसत असल्याने वाढती महागाई शेतकऱ्यांना पेलत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी, महागाईमुळे लग्नासारखे शुभ काम तर टाळता येणार नाही त्यामुळे शिरजगावच्या अवलिया शेतकऱ्याने एक नामी शक्कल लढवत आपल्या मुलाचे वऱ्हाड लग्न स्थळी बैलगाड्याने नेले आहे. या अवलीया शेतकऱ्याने इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी वऱ्हाडी लग्न स्थळी बैलगाड्याने नेले, मात्र यामुळे इंधन दरवाढीचा निषेध झालाच शिवाय शेतकऱ्यांचे आणि बैलांचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले नाते देखील जगासमोर उभे राहिले आहे. सध्या या वऱ्हाडाची सर्वदूर चर्चा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे, याव्यतिरिक्त इंधन दरवाढ तसेच महागाई शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवीत आहे. वाढती महागाई आणि पदरी पडणार कवडीमोल उत्पन्न यामुळे शेतकरी राजा पुरता बेजार झाला आहे. मात्र शेतकऱ्याकडे काही नसले तरी त्याचा हक्काचा सोबती आणि सुखदुःखाचा साक्षीदार बैल मात्र कायम त्याच्या सहवासात राहणार आहे. आणि शेतकऱ्याला या आपल्या निस्वार्थी सोबत्याचा नेहमीच अभिमान असतो. आणि त्यामुळे लग्नासारख्या पवित्र कार्यात आपला सुखदुःखाचा सोबती हजर राहणे महत्त्वाचे आहे, या अनुषंगाने बैलजोडी द्वारे आपण वऱ्हाडी लग्न स्थळी घेऊन जात असल्याचे विशाल यांनी सांगितले. तसेच इंधन दरवाढ झाली असल्याने गाड्यांचा वापर करणे आता सर्वसामान्यांना शक्य नसल्यामुळे वऱ्हाडी चक्क बैलगाडीतून विवाहस्थळी घेऊन जात असल्याचे देखील सांगितले गेले.
लग्न समारंभ म्हटले, की शाही थाट, आलिशान गाड्या, नवरदेवासाठी मोठी शाही सवारी या सर्व बाबी बघायला मिळतात. मात्र अशा मॉडर्न जगात बैलगाडीतून बऱ्हाडी विवाहस्थळी नेले असल्याने ही बाब पंचक्रोशीत तसेच जिल्ह्यात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या अनोखी वरातीचे कौतुक करत आहेत. लग्नात अलीकडे मध्यमवर्गीय लोक देखील लाखोंचा खर्च करत असतात, मात्र शेतकरी राजा हा आपल्या साध्या जीवनशैलीमुळे ओळखला जात असतो आणि म्हणून मौजे शिरजगाव येथील विशाल कांबळे यांनी देखील अगदी साध्या पद्धतीने वरात विवाहस्थळी नेली आहे. यामुळे लग्नासाठी होणारा अवाजवी आणि नाहक खर्च टळला आहे, तसेच यामुळे इंधन दरवाढीचा निषेध देखील केला गेल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 14 February 2022, 09:44 IST