1. बातम्या

मराठवाड्यात दुष्काळाचे सावट

KJ Staff
KJ Staff

लहरी पाऊस आणि पिकांना पाण्याचा ताण त्याच्या साथीला बोंड अळी यामुळे हाताशी आलेली पिके जाता आहेत या भयावह परिस्तिथीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मराठवाड्यातील पीक परिस्थिती नाजूक झाली आहे. पिके वाचविण्यासाठी नांदूर-मधमेश्वर जलद गती कालव्यातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यासाठी तसेच जायकवाडीतूनही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही महसूल मंडळांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले असून मराठवाडय़ातील बहुतांश पिकांवर कीड आणि बोंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाने या अनुषंगाने तयार केलेले अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर तालुक्यात लोणी महसूल मंडळात नायगव्हाण, शिऊर महसूल मंडळातील विरोळा, वळण, कविटखेडा या गावांमध्ये पिके कोमेजली असून तातडीने पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार आहे. वैजापूर तालुक्यातील २४ गावांमध्ये अतिशय कमी पाऊस झाल्याने मका, मूग, तूर, भुईमूग, उडीद आणि कापूस ही ५९८१ हेक्टरावरील पिके जवळपास जळाली आहेत.

पैठण तालुक्यातील लोहगाव, विहामांडवा, बिडकीन, ढोरकीन या महसूल मंडळात पाऊस न झाल्यामुळे पेरणीच होऊ शकली नाही. फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा महसूल मंडळात पिके वाळू लागली आहेत. अशीच स्थिती गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, मांजरी येथील आहे. ज्या ठिकाणी पिके आली तेथे कीड आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात मका पीक सर्वाधिक घेतले जाते. मक्यावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसाचे क्षेत्र जरी घटले असले तरी रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कन्नड तालुक्यातील आठ गावांमध्ये, सोयगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. जालना जिल्ह्य़ातही अशीच स्थिती आहे. तुरीवरही पाने गुंडाळणारी अळी आली असून मूग आणि उडदाची उत्पादकता घटली आहे. उडदावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनवरही किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून बीड जिल्ह्य़ात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters