मराठा आरक्षणाची धग काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, उद्यापासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. उद्या 15 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी मनोज जरांगेंची सभा होणार असून 125 एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात आलं आहे. ही सभा उद्या संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.
दरम्यान या सभेला एक लाख मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तर, तब्बल 125 एकर शेतात होणाऱ्या या सभेची तयारी पूर्ण झाली असून सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उजनी जलाशयाच्या सानिध्यात या सभेच
आयोजित करण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभेत सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना इशारा देत जरांगे म्हणाले की, तुम्ही काय चीज आहे, हे आम्हाला आता कळले, तुम्ही 5 ते 6 जण काय नमुने आहेत, हे आम्हाला कळलं. त्यामुळे तुम्ही आता आमचे मराठ्यांचे शत्रू झालात. मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या त्या 6 जणांचे नावे सांगतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे आता कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published on: 14 November 2023, 04:26 IST