News

बीडमधील वडवनी तहसील कार्यालय आणि बाजार समितीमध्येही रात्री उशिरा जमावाने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरा वडवली शहरात ही घटना घडली आहे. यावेळी घोषणा देत आलेल्या जमावाने कार्यालयातील फर्निचरची मोठी नासधूस केली आहे.

Updated on 31 October, 2023 11:43 AM IST

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज राज्यभरात आक्रमक झाला आहे. काही भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या हिंसक आंदोलनाचा लालपरीला मात्र फटका बसला आहे. यामुळे राज्यभरातील बहुतांश भागातील बससेवा बंद करण्यात आली आहे. अनेक भागात बसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बीडमध्ये १०० पेक्षा जास्त बसेची तोडफोड
मराठा समाज बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. सुरुवातीला बस पेटवण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर मात्र हे लोन आमदारांचे घर पेटवण्यापर्यंत गेले. यामुळे बीड जिल्ह्यात मोठा प्रमाणात तणाव दिसून येत आहे. शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे.छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

बीडमधील वडवनी तहसील कार्यालय आणि बाजार समितीमध्येही रात्री उशिरा जमावाने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरा वडवली शहरात ही घटना घडली आहे. यावेळी घोषणा देत आलेल्या जमावाने कार्यालयातील फर्निचरची मोठी नासधूस केली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे मुख्य बसस्थानक मोकळे पाहायला मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातून येणाऱ्या बसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून सुटणाऱ्या बसेस देखील बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांची आता गैरसोय होताना दिसत आहेत.

राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याने राज्यातील बससेवा बंद करण्यात आली आहे. तसंच अनेक भागातील नागरिक रस्त्यावर असल्याने जाळपोळ सुरु आहे. यामुळे प्रशासनाने बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, पुणे, नांदेड, बीड, पंढरपूरकडे जाणाऱ्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या.

English Summary: Maratha movement Update Protest hits Lalpari bus service stopped
Published on: 31 October 2023, 11:43 IST