गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे. सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले होते. तसेच आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केलं.
जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्रभर दौरवर आहेत. यासंर्दभात माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. अशी कोणतीही गोष्ट होणार नाही. हे मी मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या तोंडावर सांगून आलो होतो; पण जरांगे पाटलांना बोलायला कोण सांगत आहे, निवडणुकीच्या तोंडावर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल असे विधान राज ठाकरे यांनी केले.
यानंतर राज ठाकरे यांच्या विधानाला मनोज जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी ते शोधून काढावं, आम्हाला देखील ऐकायचं आहे, या मागे कोण आहे ? तुम्ही शोधावं आणि आम्हाला पण सांगावं असं थेट आव्हान त्यांनी ठाकरेंना दिलं आहे. मराठा समाजाचे कल्याण व्हायला लागले, की असे खोटे आरोप करून पुड्या सोडल्या जातात, पण मराठा समाज आता कोणाचेही ऐकणार नाही. मराठा समाजाला आता आपलं हित कळलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणारच असे जरांगे पाटील म्हणाले.
Published on: 16 November 2023, 05:14 IST