राज्यातील जनता गेल्या अनेक दिवसापासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. बळीराजा अगदी चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून मान्सूनची प्रतीक्षेत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला महाराष्ट्रात लवकर मान्सून आगमन याबाबतचा अंदाज आता फोल ठरला आहे.
यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ मान्सूनची प्रतीक्षा बघावी लागणार आहे. या दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे राहणार आहेत. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस तूर्तास तरी आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
यंदा 29 तारखेला मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला म्हणजेच नेहमीपेक्षा या वर्षी जवळपास 3 दिवस लवकर मान्सून केरळ मध्ये दाखल झाला. यामुळे या वर्षी मान्सून महाराष्ट्रात लवकर प्रवेश करेल अशी प्रत्येकाला आशा होती शिवाय भारतीय हवामान विभागाने देखील असाच काहीसा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून केरळ मध्ये आल्यानंतर कर्नाटक मध्ये सध्या दबकलेला दिसत आहे.
मान्सून हा कर्नाटकच्या कारवारमध्ये अडकला आहे. मान्सून प्रवासाला सध्या पोषक वातावरण नसल्याने मान्सूनचा प्रवास संथ गतीने होत आहे. मात्र या दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे.
मात्र असे असले तरी मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या काळात उष्णतेची लाट राहणार असल्याने पुढील पाच दिवस राज्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे.
मान्सून केरळ मध्ये लवकर दाखल झाल्याने महाराष्ट्रमध्ये मान्सून लवकर येणार असे हवामान खात्याने सांगितलं होत मात्र आता मान्सूनच्या प्रवासात अडथळा येत असल्याने मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल होणार आहे. एकीकडे मान्सूनचा प्रवास मंदावला असून मान्सून राज्यात उशिरा एंट्री घेणार आहे.
तर तिकडे उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट पाहायला मिळतं आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात तसेच उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. आणखी दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
Published on: 05 June 2022, 11:59 IST