राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी एका वादग्रस्त निर्णयाला मंजुरी दिली आहे, सरकारच्या या निर्णयाद्वारे आता राज्यातील 1 हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सत्ता पक्ष आणि विपक्ष यांच्यात वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी पक्ष या निर्णयाचे हात पसरवून स्वागत करत आहे तर विरोधी पक्ष सरकारच्या या निर्णयाचा तीक्ष्ण शब्दात विरोध करत आहे. त्यामुळे राज्यात एका नवीन राजकीय युद्धाला सुरुवात झाली आहे.
राज्यात अनेक वाईनरी आहेत, वेगवेगळ्या फळांपासून राज्यात वाईन निर्मिती केली जाते. असे असले तरीकेवळ द्राक्षापासून तयार केलेल्या वाईनला अधिकृत मान्यता मिळालेली आहे. द्राक्षे पंढरी म्हणून विख्यात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वाईन साठी लागणाऱ्या द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र असे असले तरी वाईन साठी लागणाऱ्या द्राक्षांचे उत्पादन जिल्ह्यात नव्हे नव्हे तर राज्यात अगदी अत्यल्प आहे. तरीदेखील नाशिक जिल्ह्यात अनेक वाईनरी वाईन तयार करत असतात. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वाईन तयार करण्यासाठी वाईन पार्क विंचूर येथे स्थित आहे. त्यामुळे सरकारने दावा केला आहे की, सरकारच्या या निर्णयामुळे वाईनरीजला फायदा मिळणार आहे आणि परिणामी द्राक्ष बागायतदारांचे हित जोपासले जाणार आहे. मात्र विरोधी पक्षाने सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा महाराष्ट्र राज्याला मद्यराष्ट्र करण्याचा डाव असल्याचा घणाघात केला आहे.
राजकीय वर्तुळात एकमेकांवर वार पलटवार होत असतानाच एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे एक व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने आपली व्यथा व्यंगचित्र मधून व्यक्त करत जशी वेगवेगळ्या फळांपासून वाईन निर्मिती केली जाते तसेच कांद्यापासून देखील वाइनची निर्मिती करण्यात यावी अशीच आर्त हाक सरकारला घातली आहे. या अवलिया कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांने कांदा हा आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याचा युक्तिवाद करत मायबाप सरकारने यापासून देखील वाईन निर्मिती करावी आणि कांदा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असा विचार आपल्या व्यंगचित्रांतून मायबाप सरकारच्या दरबारी उपस्थित केला आहे. नाशिक जिल्हा जसे द्राक्षे पंढरी म्हणून विख्यात आहे अगदी त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थात कसमादे पट्टा कांद्याचे आगार म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे. कसमादे पट्ट्यातील म्हणजेच मोसम खोऱ्यातील सटाणा तालुक्याचे कांदा उत्पादक शेतकरी आणि कार्टूनिस्ट संजय मोरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटले आहे आणि या व्यंगचित्राला आपल्या कवितेच्या माध्यमातून राज्यातील कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे यांच्याकडे एक मागणी केली आहे. त्यांनी या द्वारे कृषिमंत्री साहेबांना जर कांद्यापासून वाइन तयार केली गेली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जाईल असा संदेश दिला आहे.
बागलानचे भूमिपुत्र कार्टूनिस्ट संजय मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रांतून ज्याप्रमाणे द्राक्षांपासून वाईन निर्मिती केली जाते आणि यामुळे द्राक्ष बागायतदारांचा फायदा होतो अगदी त्याच धर्तीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील कांद्यापासून वाईन तयार करून योग्य न्याय देण्यात यावा अशी आर्त हाक मायबाप सरकारला घातली आहे. सध्या कार्टूनिस्ट संजय मोरे यांचे हे व्यंगचित्र आणि कविता शासनाच्या किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या वादग्रस्त निर्णयाच्या आणि त्यापासून सुरु झालेल्या शासनाच्या आणि विपक्षच्या गदारोळात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Published on: 30 January 2022, 10:32 IST