शेती क्षेत्रात काळानुरूप मोठमोठे बदल झालेत पीक पद्धतीमध्ये देखील मोठा अमुलाग्र बदल झाला. मात्र याची व्याप्ती डोळ्यात खुपणारी नव्हती. तुरळक शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला, मात्र बहुसंख्य शेतकरी पीक पद्धतीत बदल करण्याचे धाडस दाखवत नव्हते त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बेजार झालेल्या बळीराजाला आता पीक पद्धतीत बदल करणे भाग पडत आहे. आतापर्यंत बोटावर मोजता येतील एवढेच शेतकरी पीकपद्धतीत बदल करण्याचे धाडस दाखवत होते मात्र निसर्गाच्या लहरीपणाने उशिरा का होईना अनेक शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल घडवण्याचे शहाणपण शिकवल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सतत बदलत असलेल्या बाजारपेठेतील मागणीमुळे शेतकरी बांधवांना नवनवीन प्रयोग शेती क्षेत्रात आजमावे लागत आहेत. या नवीन प्रयोगामध्ये नवीन पीक पद्धतीचा अवलंब करण्याचा देखील समावेश आहे. मायबाप सरकारने देखील शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित केले होते मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या या प्रोत्साहनाला अपेक्षित असा प्रतिसाद दाखवला नाही मात्र आता पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज बनली असल्याने शेतकरी बांधवांनी हा बदल स्वीकारला आहे. म्हणूनच आता राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी मुख्यता खरिपात उत्पादित केल्या जाणाऱ्या सोयाबीनची लागवड उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात केली आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले म्हणून काट्याने काटा काढला जातो या धोरणाचा अवलंब करत शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील नुकसानची भरपाई भरून काढण्यासाठी उन्हाळी हंगामात सोयाबीन पिकाचाचं सहारा घेतला.
खरिपात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यात सर्वत्र मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे तसेच उन्हाळी सोयाबीनच्या पिकासाठी पोषक वातावरण असल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. जे पावसाळ्यात झाले नाही ते उन्हाळ्यात करू या हेतूने सोयाबीनची अद्यापही पेरणी जोरात सुरू असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. तसं बघायला गेलं तर सोयाबीन एक खरिपातील पिक आहे, मात्र आता शेतकऱ्यांनी एक नवीन प्रयोग करत या खरिपातील मुख्य पिकाची लागवड उन्हाळी हंगामात जोमात केली आहे, विशेष म्हणजे उन्हाळी सोयाबीन पेरणीचा हा ओळखीच्या पिकाचा नवखा प्रयोग एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी केल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.
उन्हाळी हंगामात बेमोसमी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली खरी मात्र उन्हाळी सोयाबीन मधून खरीप प्रमाणे उत्पादन प्राप्त होईल की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता कायम आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना उन्हाळी सोयाबीनची विशेष काळजी घेणे अपरिहार्य ठरले आहे. उन्हाळी सोयाबीनच्या लागवडीत एकात्मिक कीड व्यवस्थापन झाल्यास यातून दर्जेदार उत्पादन मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कृषी वैज्ञानिकांच्या मते, निंबोळी अर्क, बिव्हेरिया बॅसियानासारख्या जैविक औषधांचा तसेच इमामेक्टिन बेन्झाएट, क्लोरअॅट्रनिलीप्रोल सारख्या रासायनिक किटकनाशकाचा योग्य पद्धतीने एकात्मिक उपयोग केल्यास दर्जेदार उत्पादन मिळण्याचे आसार आहेत.
Published on: 02 February 2022, 12:12 IST