Mahavitaran Strike News : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल झाली आहे. महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (employees) संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. साताऱ्याच्या ग्रामीण भागातही बत्ती गुल झाली आहे. आधीच ग्रामीण भागात लोडशेडिंगचं संकट असतं. त्यात आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारीच उपलब्ध नाहीत.
तसंच वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो पुर्ववत करणार नसल्याचं पत्रकही संपकरी वीज कर्मचाऱ्यांना काढलंय. तेव्हा ग्रामीण भागातला वीजपुरवठा कधी पुर्ववत होणार हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. महावितरण संपकरी संघटना कर्मचारी तसच महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Published on: 04 January 2023, 09:57 IST