अॅड. संग्राम शेवाळे
भारतानंतर जगातील कोणत्या भागात तुम्हाला राहायला आवडेल ? असे जर कोणी विचारले तर त्याचे उत्तर मी 'लंडन' देईल, असे महात्मा गांधीजी १९०९ साली म्हणाले होते. लंडन येथील संसद चौकात केवळ एकमेव भारतीय व्यक्तीचा पुतळा देशाचा गौरव वाढवत आहे, ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी.
गांधीजींना शतकानंतरही वेळोवेळी कितीही मारण्याचा कोणी प्रयत्न केला तरी 'गांधी मरत का नाही?' याचे उत्तर इथे सापडते. प्रख्यात स्कॅाटिश शिल्पकार फिलिप जाँनसन यांनी हा ९ फुट उंचीचा तांब्याच्या धातूपासून गांधीजींची विचारउंचीची दिव्य प्रेरणा जपण्यासाठी त्यांचा स्मृती पुतळा तयार केला आहे. महात्मा गांधी हे साऊथ आफ्रिकेतून भारतात परतण्याच्या घटनेला २०१५ ला १०० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक पार्श्वभुमीवर हा पुतळा येथे उभारण्यात आला, हे विशेष.
महात्मा गांधी १८८८ साली कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडन शहरात आले होते. लंडनला येताना गांधीजींनी त्यांच्या आईला एक वचन दिले होते, ते असे की, "मी विलायतेत शिक्षण घेत असताना कधीच दारु आणि मासाहार खाद्य किंवा महिला हे व्यसन करणार नाही" हे वचन त्यांनी जपले देखील.
लंडन शहरात हाकेच्या अंतरावर मद्य दुकान आणि मासाहार उपलब्ध आहे. तसे पाहता तेथिल बहुतांश लोक मासाहार करणारेच. पण गांधींजीनी मनावर नियंत्रण ठेवून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. मी मांसाहारी असलो तरी अन्य दोन बाबतीत गांधींच्या मूल्यांचे पालन लंडन शहरात करत आहे.
महात्मा गांधीनी ज्या शहरात कायद्याचे शिक्षण घेतले. समकालीन जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या. भारतानंतर ज्या भागावर त्यांचा विशेष लोभ होता, त्या लंडन शहरात गांधींजींच्या जयंतीनिमित्त फिरताना पुस्तकात वाचलेला इतिहास डोळ्यासमोर अनुभवता येतोय, हीच खरी धन्यता आहे.
गांधी हा केवळ एक देह नव्हे तर विचार आहे. तो जागतिक कल्याणाचा विचार आहे. ह्या विचारांची कुणी गोळ्या घालून हत्या करु शकणार नाही. जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होईल तेव्हा तेव्हा हा विचार पुन्हा मातीत खोलवर रुजत जाईल. हिरवी समृद्धी जगाला अर्पीत करत जाईल.
महात्मा गांधी जयंती निमित्ताने तूर्तास एवढंच.
Published on: 02 October 2023, 03:05 IST