मुंबई
“देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
'माझी माती माझा देश'या अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वल राहील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा वारसा आहे. त्यासोबत, संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची मोठी फळी या महाराष्ट्राने देशाला दिली. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांनी योगदान दिले. त्यामुळे केवळ त्यांच्या बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, याच उद्देशाने 'माझी माती माझा देश' अभियान राबवले जात आहे, असंही शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुढे शिंदे म्हणाले की, महात्मा गांधींनी ब्रिटिशांना 'चले जाव'चा नारा येथूनच दिला आणि तरुणामध्ये चेतना जागविली. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अशा असंख्य हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
Published on: 09 August 2023, 06:22 IST