मुंबई: राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2019’ चे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. स्टार्टअप सप्ताहामुळे इच्छुक स्टार्टअपना त्यांच्या अभिनव संकल्पनांच्या सादरीकरणासाठी नामी संधी उपलब्ध होणार असून यामुळे थेट शासनासोबत काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
2018 मध्ये पहिल्यांदा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या वर्षी तब्बल 900 स्टार्टअप या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून येत्या 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रातील स्टार्टअप नी आपले अर्ज ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ कडे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज केलेल्यांपैकी उत्कृष्ट ठरलेल्या 100 स्टार्टअप्सना त्यांच्या अभिनव संकल्पना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्या समोर मांडण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअप नी सादर केलेल्या सादरीकरणाच्या आधारे समितीमार्फत चर्चा होऊन त्यातील निवडल्या गेलेल्या 24 विजेत्या स्टार्ट-अप्सना प्रत्येकी रु. 15 लाख रुपयांपर्यंतची शासकीय कामे देण्यात येणार आहेत.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2019 असून इच्छुक स्टार्टअप www.mahastartupweek.msins.in याठिकाणी अर्ज करू शकतात. तसेच www.twitter.com/MSInSociety, www.facebook.com/MSInSociety येथे फॉलो करू शकतात. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदर्शन, कार्यशाळा, व्हेन्चर कॅपिटलिस्टस् यांना भेटण्याची संधी, समिती चर्चा, नेट्वर्किंग इव्हेंटस, व्याख्यानमाला आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Published on: 07 January 2019, 08:11 IST