नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राचे सागरी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) सागरमाला योजनेंतर्गत आतापर्यंत 12 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून, त्यासाठी 230.24 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. सध्या 783.08 कोटी रुपये खर्चाच्या 14 प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी आठ प्रस्ताव सागरमाला योजनेसाठी मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या प्रगतीसाठी मंजुरी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या बैठकीत आगामी काळात राज्यातील बंदरे विभागात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
सागरी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर संवाद घडवून आणण्यासाठी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई पोर्ट प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण आणि शिपिंग महासंचालनालय यांसारख्या प्रमुख संस्थांची त्रैमासिक संयुक्त बैठक घेण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना विनंती केली. विविध संस्थांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी या बैठका उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Published on: 12 June 2025, 02:11 IST