कोल्हापूर: तुमच्या शेतीची चिंता तुम्ही करू नका. शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कोल्हापूर येथील शिवाजी पूल येथे भेट देवून रेस्क्यू ऑपरेशन आणि पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.
यानंतर कल्याणी हॉल येथे पूरग्रस्तांच्या शिबीराला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. ते म्हणाले, तुमचे जीवन महत्वाचे आहे. तुम्ही सुखरूपणे बाहेर आलात याच जास्त समाधान आहे. जे काही तुमच्या शेतीचे नुकसान झाले असेल त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याची चिंता करू नका. ती आमची जबाबदारी आहे.
यानंतर त्यांनी छत्रपती शाहू विद्यालय येथील पूरग्रस्त शिबीराला भेट दिली. येथील पूरग्रस्तांसाठी केलेली व्यवस्था पाहून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना घरांची तसेच शेतीची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना आरोग्याची सुविधा दिली जाईल, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.
या पाहणी दौऱ्यात पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मलिन्नाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Published on: 09 August 2019, 08:26 IST