पुणे: साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. उसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनाने 40 लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, बबनदादा शिंदे, कल्लप्पा आवाडे, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील,दिलीपराव देशमुख, राजेश टोपे, इंडियन शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार,जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त शेखर गायकवाड, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, निवृत्त साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. तरीही गेल्या चार वर्षात एफआरपीची रक्कम देण्यात महाराष्ट्राचे काम चांगले आहे. साखरेचा हमीभाव कमीतकमी 29 रुपयांवरुन 31 रुपयांवर करण्याविषयी केंद्र सरकारला विनंती करणार आहे. तसेच ऊस वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सर्वाधिक पाणी लागणारे पीक म्हणून ऊस पिकावर टीका होत असते परंतु त्यासाठी उसाचे सर्व क्षेत्र ठिबकखाली घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आता बीटसारखा पर्याय निवडण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे काही चांगले परिणाम दिसत आहेत. साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच साखरेच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून यावर कारखान्यांनी विचार करावा. उसासारख्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या उद्योगाला जगविण्यासाठी सरकारबरोबर साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. राज्यावर दुष्काळाची छाया आहे, त्यामुळे पुढच्या साखर हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. साखर उद्योगाला जगविण्यासाठी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यावर सर्वांनी भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्या भाषणात श्री. शरद पवार म्हणाले, यावर्षी देशात 160 लाख टन साखर शिल्लक असून अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी देण्यात मोठी अडचण येत आहे. साखरेच्या निर्यातीसाठी सरकारने अनुदान दिले ही चांगली बाब आहे. साखर व्यवसाय हा महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या व्यवसायामुळे राज्याला चांगले आर्थिक उत्पन्न होत आहे. उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्याने ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती दिसत आहे, त्यामुळे पुढील वर्षी साखर हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादकांसमोर हुमणी किडीच्या प्रादुर्भावाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. युरोपच्या धर्तीवर आपल्या येथेही बीट शेतीसाठी प्रयोग करण्याची आवश्यकता असून साखर उद्योगाला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल व मेंटेनन्स बुक फॉर शुगर इंजिनिअर्स या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यातील ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देण्यात आलेले पुरस्कार:
दक्षिण विभाग:
- पूर्व हंगामात पहिला क्रमांक सौ. शोभा धनाजी चव्हाण, मु.पो. घोगांव, ता. पलूस, जि. सांगली, राजारामबापू पाटील साखर कारखाना, वाळवा.
- सुरु हंगामात पहिला क्रमांक श्री. मोहन भरमा चकोते, मु.पो. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, श्री. दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ.
- खोडवा हंगामात पहिला क्रमांक दत्तात्रय चव्हाण, मु.पो. वांगी, ता. कडेगाव, जि सांगली.
मध्य विभाग:
- पूर्व हंगामात पहिला क्रमांक श्री. शिवाजी गजेंद्र पाटील, मु.पो. नेवरे, ता. माळशिरस,जि. सोलापूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, अकलूज.
- सुरु हंगामात पहिला क्रमांक श्री. प्रकाश बाळासाहेब ढोरे, मु.पो. वडगाव, ता. मावळ,जि. पुणे, श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मुळशी.
- खोडवा हंगामात पहिला क्रमांक श्री. तानाजी बळी पवार, मु.पो. लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, अकलूज.
उत्तरपूर्व विभाग:
- पूर्व हंगामात पहिला क्रमांक श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, मु.पो. बाभळगाव, लातूर, विलास साखर कारखाना, निवळी, जि. लातूर.
- खोडवा हंगामात पहिला क्रमांक श्री. रविकिरण मोहन भोसले, मु.पो. खामसवाडी, केशेगाव, जि. उस्मानाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, केशेगाव, जि. उस्मानाबाद.
राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी:
- कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार: श्री. चवगोंडा अण्णा पाटील, रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, दत्ता शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.
- कै. वसंतराव नाईक पुरस्कार: सौरभ कोकीळ, मु.पो. धामणेर, ता. कोरेगाव, जि. सातारा, जयवंत शुगर्स लि. धावरवाडी, ता. कराड, जि. सातारा.
- कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार: मारोती ज्ञानू शिंदे, मु.पो. वाठार, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर.
विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार:
दक्षिण विभाग:
- प्रथम क्रमांक: उदगिरी शुगर अॅण्ड पॉवर लि. ता. खानापूर, जि. सातारा.
- द्वितीय क्रमांक: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, ता. करवीर.
- तृतीय क्रमांक: क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू, लाड साखर कारखाना, ता. पलूस.
मध्य विभाग:
- प्रथम क्रमांक: श्री अंबालिका शुखर प्रा. लि. ता. कर्जत.
- द्वितीय क्रमांक: अगस्ती साखर कारखाना, ता. अकोले.
- तृतीय क्रमांक: सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, ता. माळशिरस.
उत्तर पूर्व विभाग:
- प्रथम क्रमांक: विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, ता. लातूर.
- द्वितीय क्रमांक: विलास साखर कारखाना, निवळी, लातूर.
- तृतीय क्रमांक: बारामती अॅग्रो लि. ता. कन्नड, जि. औरंगाबाद.
उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार:
- दक्षिण विभाग: छत्रपती शाहू साखर कारखाना, ता. कागल.
- मध्य विभाग: नीरा भीमा साखर कारखाना, ता. इंदापूर
- उत्तरपूर्व विभाग: रेणा साखर कारखाना, ता. रेणापूर.
- कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार: रेणा साखर कारखाना,ता. रेणापूर, जि. लातूर.
- कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार: दौंड शुगर प्रा.लि., दौंड
- कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार: पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, ता. कडेगाव, जि. सांगली
- कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार: डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखाना
- सा.रे.पाटील सर्वोकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार: विघ्नहर साखर कारखाना,ता. जुन्नर
- विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार: छत्रपती शाहू साखर कारखाना
उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार:
- दक्षिण विभाग: क्रांती अग्रणी डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखाना, पलूस
- मध्य विभाग: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ता. मेढा
वैयक्तिक पुरस्कारांची यादी:
- उत्कृष्ट मुख्य शेती अधिकारी: संभाजी पांडुरंग थिटे
- उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी: आर. के. गोफणे
- उत्कृष्ट चीफ इंजिनिअर: गजेंद्र गिरमे
- उत्कृष्ट चीफ केमिस्ट: संजय साळवे
- उत्कृष्ट चीफ अकाऊंटंट: अमोल अशोकराव पाटील
- उत्कृष्ट आसवाणी व्यवस्थापक: धैर्यशील रणवरे
- उत्कृष्ट कार्यकारी संचालक: राजेंद्रकुमार रणवरे
- उत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी: राजेंद्र चांदगुडे, संतोष वाघमारे, सिकंदर शेख
Published on: 16 December 2018, 08:01 IST