डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. प्रविण झिने
लम्पी स्कीन हा पशुधनातील वेगाने पसरणार संसर्गजन्य आजार आहे. यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी दुध उत्पादनात खुप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास आजाराची लागण आणि प्रसार टाळता येईल.
१. उगम
हा आजार १९२९ मध्ये साऊथ आफ्रिकेतील जाम्बिया भागातून जगभरात पसरला आहे. भारतात पहिल्यांदा लम्पी रोग ऑगस्ट २०१९ साली ओडिसा राज्यात आढळला. त्यानंतर राज्यात (दि.४.०८.२०२२) रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमतः गोवंशीय पशुधनात विषाणूजन्य लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे.
२. प्रभावित जनावरे कोणती
लम्पी स्कीन (lumpy skin disease) हा गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांना जडणारा देवी वर्गीय विषाणूजन्य आजार आहे. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये आजाराची तीव्रता आणि मृत्युदर अधिक असतो. त्या तुलनेने देशी जनावरांच्यामध्ये या आजाराची तीव्रता आणि मृत्युदर कमी असल्याचे दिसून आले आहे.
३. कारक जीव आणि प्रसार
कॅप्रीपॉक्स या देवी वर्गीय विषाणूमुळे (Capripox Virus) हा आजार होतो. वाहतुकीमुळे या आजारास कारणीभूत विषाणू लांब अंतरापर्यंत संक्रमित होवू शकतो. आजाराचे विषाणू बाधित जनावरांच्या रक्तात किमान पाच दिवस ते दोन आठवडे पर्यंत राहतात. एडीस प्रजातीच्या किटकाव्यतिरिक्त स्टोमॉक्सीस माशा आणि रिफिसेफॅलस गोचिडव्दारे या आजाराचा प्रसार होतो. अशा जनावरांचे रक्त शोषण करणारे किटक रोगप्रसाराचे कार्य करतात. तसेच डास, चिलट, दूषित पाणी व चारा आणि बाधीत जनावरे या कारणीभूत ठरतात. सूर्यप्रकाशात हा विषाणू निष्क्रिय होतो. मात्र ढगाळ वातावरणात (Cloudy Weather), अंधाऱ्या ठिकाणी आणि बाधित गोठ्यात काही महिने सक्रिय राहतो. हा आजार दमट आणि उष्ण वातावरणात जास्त प्रमाणात दिसून येतो.
लक्षणे दाखवीत असलेल्या जनावरांच्या त्वचा, अश्रू, लाळेवाटे १८ ते २० दिवसांपर्यंत विषाणूचे उत्सर्जन होते. बाधीत वळूच्या वीर्यात विषाणू उत्सर्जीत होतात. त्यामुळे विषाणू प्रदूषित विर्यातून रोगप्रसार होण्याची शक्यता असते. बाधित जनावराच्या दुधात सुद्धा विषाणू उत्सर्जन होते. दुधावाटे वासरांत रोगप्रसार होतो. माणसात याचा प्रसार होत नाही. तरी दूध उकळून प्यावे.
४. लक्षणे
जनावरे चारा खाणे, पानी पीने प्रमाण कमी होते. रोगाचे संक्रमण झाल्यानंतर विषाणू साधारण दोन आठवड्यापर्यंत रक्तामध्ये वास्तव्य करतात. शरीराच्या विविध भागात विषाणू संसर्गा वेदनादायी दाह निर्माण होतो. जनावरे साधरणत एक ते पाच आठवड्यानंतर लक्षणे दाखविण्यास सुरुवात करतात. सर्वप्रथम डोळ्यातून अश्रू आणि नाकातून शेंबूड वाहण्यास सुरवात होते. डोळ्यांवर चिपाड येतात. खांदा आणि मांडीतील लसिका ग्रंथी सुजतात, ताप ४०.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त येतो. ताप एक आठवड्यापर्यंत राहू शकतो. दूध उत्पादन अचानक कमी होते. ताप आल्यानंतर ४८ तासांत त्वचेवर १० ते ५० मिलिमीटर परिघाच्या गाठी येतात अशाच गाठी पचनसंस्था, श्वसनसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या विविध अवयवात दिसतात. त्यात पूसारखे द्रव्य साठते. त्या ठिकाणी व्रण तयार होतात.
व्रणाच्या सभोवताली खपल्या तयार होतात. तोंड आणि नाकाच्या श्लेष्म त्वचेवर व्रण दिसतात. पू-मिश्रित देंबुड दिसून येतो. लाळ जास्त प्रमाणात गळते. बाधित जनावरांत फुफ्फुसाचा दाह, कासेचा दाह आणि पायावर सूज दिसून येते. गुरे लंगडतात वैरण कमी खातात, रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते. वळू काही काळ किंवा नेहमीसाठी नपुंसक बनू शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. बाधित गायी कित्येक महिने फळत नाहीत. बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात बरी होतात. मात्र बरी झालेली जनावरे पुढील ४० ते ४५ दिवसापर्यंत विविध स्त्रावांत विषाणू उत्सर्जन सुरूच ठेवतात.
५. प्राथमिक काळजी, नियंत्रण आणि उपचार
आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एक मात्र प्रभावी उपाय आहे. सध्या आपल्या देशात या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी डोळ्यांच्या देवीची लस वापरली जाते. सामान्यतः या रोगावर लस उपलब्ध नसल्यामुळे शेळ्यांमध्ये देवी रोगावर वापरण्यात येणारी लस टोचून हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. आता लम्पी स्कीन रोगाच्या नियंत्रणासाठी हिसार येथील राष्ट्रीय अश्व् संशोधन केंद्राने 'लंपी प्रोव्हॅकइण्ड' (Lumpi-ProVacind) ही लस विकसित केली आहे. लसीची मात्रा प्रती जनावर १०३ टी.सी.आय.डी. ५० असावी. मात्र उद्रेक तीव्र असल्यास प्रती जनावर १०३.५ टी.सी.आय.डी. ५० एवढी मात्रा द्यावी. बाधित जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. जनावरांवर किटक माशा आणि गोचिडींचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. गोठ्या जवळ सांडपाणी आणि पावसाचे पाणी साचणार नाही याची योग्य काळजी घ्यावी. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या गोठ्यातील भेटी शक्यतो टाळाव्यात. मृत जनावरे खड्डात मीठ टाकून पुरावे.
६. जनावरे दगवल्यास किती मदत मिळते
केंद्र शासनाच्या “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९” अन्वये लम्पी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे. शेतकरी पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे १०० टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत तसेच सदर बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षते खाली 'समिती गठीत करण्यांचे मंत्रिमंडळाने निर्देश दिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या लम्पी आजाराने दुभत्या जनावरांचे मुत्यु झाल्यास ३० हजार रुपये (एका कुंटुबातील ३ जनावरांना मिळणार) आणि बैलांचा मुत्यु झाल्यास २५ हजार रुपये (एकाच कुटुंबातील ३ जनावरांना मिळणार) आणि वासरांना १६ हजार रुपये मिळणार (एकाच कुटुंबातील ६ जनावरांना मिळणार) आहे.
Published on: 14 September 2023, 05:28 IST