मुंबई: लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी होणार असून राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जनतेला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. तसेच 1950 या टोलफ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या व 24 तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातील 022-22040451/54 या क्रमांकावर देखील निवडणूक निकालाची अद्ययावत माहिती मिळणार आहे. मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा नियंत्रण कक्ष देखील 24 तास कार्यरत राहणार आहे.
Published on: 22 May 2019, 07:18 IST