Nashik News : देशात आज लोकसभा निवडणुकीचा ५ वा टप्पा पार पडत असून राज्यातील हा शेवटचा टप्पा आहे. मात्र या शेवटच्या दोन टप्प्यात शेतकरी सरकारविरोधात नाराज असल्याचं दिसून आलं आहे. आज (दि.२०) रोजी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मतदान करताना विविध गोष्टीचा वापर करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. नाशिकमधील शेतकऱ्यांनी मतदान करण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचा वापर केला आहे. तसंच काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदान केलं आहे.
चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याचा निषेध करत गळ्यात कांद्याच्या माळा घालत मतदान करण्याचा निश्चिय केला होता. पण संबंधित तरुण गळ्यात कांद्याच्या माळा घालून येताना दिसून येताच पोलिसांनी या तरुणांना मतदान केंद्राच्या गेटवरवरच अडवले. पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर गळ्यातील माळा काढून ठेवत हे तरुण मतदानाला गेले.
सरकारविरोधात कांदा उत्पादक नाराज
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तसंच कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क देखील लावले होते. यामुळे या फटका थेट उत्पादकांना सोसावा लागला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जवळपास ३ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झालं.
नाशिकमध्ये मोदींच्या सभेत तरुणांकडून कांद्यावर बोला घोषणाबाजी
नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ (दि.१६) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना संबंधित तरुणाने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर मोदींना कांदा प्रश्नावर बोलावं लागलं होतं.
दरम्यान, मागील टप्प्यात झालेल्या मतदानावेळी देखील अनेक शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो आणि दूध यांचा वापर केला होता. तर काही शेतकऱ्यांनी दूधाल दर नसल्यामुळे मतदान केंद्राबाहेर दूध ओतून देत मतदान केले होते.
Published on: 20 May 2024, 03:32 IST