News

मुंबई: राज्यात ३ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत, एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतू ही वाट अत्यंत निसरडी आहे. ती चालतांना आपल्या सर्वांना एकमेकांचे हात हातात धरून अतिशय जबाबदारी आणि खबरदारीने पुढे जायचे आहे. एकदा सुरु केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, त्यासाठी स्वंयशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवत वाटचाल करतांना देशापुढे महाराष्ट्राचा आदर्श प्रस्थापित करावयाचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Updated on 02 June, 2020 9:10 AM IST


मुंबई:
राज्यात ३ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत, एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतू ही वाट अत्यंत निसरडी आहे. ती चालतांना आपल्या सर्वांना एकमेकांचे हात हातात धरून अतिशय जबाबदारी आणि खबरदारीने पुढे जायचे आहे. एकदा सुरु केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, त्यासाठी स्वंयशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवत वाटचाल करतांना देशापुढे महाराष्ट्राचा आदर्श प्रस्थापित करावयाचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल करतांना ३,५ आणि ८ जूनच्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या बाबींना शिथिलता देण्यात आली आहे, याची माहिती यावेळी दिली.   येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळ धडकण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचेही आवाहन केले, तसेच शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतची माहितीही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.

गर्दी करू नका-संयम आणि शिस्त पाळा

पहिल्या टप्प्यात ३ जूनपासून खासगी आणि सार्वजनिक मैदानांवर, समुद्र किनाऱ्यांवर सायकलिंग, जॉगिंग आणि धावणे-चालणे या गोष्टींला मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत कोणत्याही सामूहिक कृतीला मान्यता नाही. ५ जूनपासून दुकाने आणि ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी असलेली खासगी कार्यालये उघडली जातील अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, आपल्याला कुठेही गर्दी करून सुरु झालेल्या गोष्टी बंद करावयाच्या नाहीत. याची काळजी प्रत्येकाने घेऊनच घराबाहेर पडायचे आहे, स्वच्छता आणि स्वयशिस्त पाळायची आहे. मास्क वापरणे, चेहऱ्याला हात न लावणे, शारीरिक अंतर ठेवणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये

येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता लक्षात  घेऊन सिंधुदूर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांनी काळजी घेण्याचे, समुद्रात न जाण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हे वादळ येण्याची शक्यता असून ते दिशाही बदलू शकते परंतू तरीही त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सर्व सेमिस्टरचे सरासरी गुण लक्षात घेऊन मार्क्स देणार

आपण टप्प्या-टप्प्याने सर्व गोष्टी उघडू, त्यासाठी घाई नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की,  आता पावसाळा सुरु होतोय, त्याची काळजी घेतांना यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा शिक्षणाचाही काळ आहे. त्याकडे लक्ष देतांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय काळजीपूर्वक आणि चर्चेअंती घेतला गेला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देऊन पास करावयाचा आणि त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. ज्यांना वाटते की परिक्षा दिल्यानंतर मी यापेक्षा अधिक चांगले मार्क्स मिळवू शकलो असतो त्यांच्यासाठी  पुढे काही कालावधीने परीक्षा घेतल्या जातील हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य

शाळेपेक्षा शिक्षण सुरु करण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण-शहरी भाग, ग्रीन झोन सह राज्यात सुरु करावयाच्या शिक्षणासाठीच्या उपाययोजनाचे शासनाचे प्रयत्न  असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्ष जिथे शाळा सुरु करता येतील तिथे शारीरिक अंतराच्या व इतर उपाययोजनांसह शाळा सुरु करणे, जिथे हे शक्य नाही तिथे ऑनलाईन शाळा सुरु करणे, टॅब, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण देणे याबाबत येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेतला जाईल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मान्यता

राज्यात ३ तारखेपासून काही गोष्टी सुरु करावयास परवानगी देण्यात आली असली तरी गर्दी करण्यास, सभा-समारंभ आणि उत्सव करण्यास अजूनही परवानगी नाही. शारीरिक अंतर हे ठेवावेच लागेल. हेच अंतर आपल्याला कोरानापासून दूर ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.  आता देण्यात आलेल्या सर्व मान्यता या काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात आल्या आहेत, त्याचे पालन करावे लागेल. झुंबड करून चालणार नाही.  सार्वजनिक ठिकाणी पहाटे पाच पासून सायंकाळी ७ पर्यंत असे व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले.

वृत्तपत्रे घरपोच

पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच देतांना वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

विषाणुच्या सर्वोच्च बिंदूवर

सध्या आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या सर्वोच्च बिंदूजवळ किंवा त्यावर आलो आहोत. केसेसची संख्या कमी जास्त होत जाईल परंतू त्यापुढे हळुहळु ही संख्या कमी होत जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की  राज्यात निर्बंध शिथील करतांना हायरिस्क गटातील व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. हृदयरोग, मधुमेह, असलेले, गरोदर स्त्रिया आणि ५५ ते ६० वयवर्षावरील व्यक्ती यांनी घरातच राहावे, बाहेर पडू नये,  मध्यम-युवा वर्ग जो कामानिमित्ताने बाहेर जाईल त्यांनी घरी गेल्यावर घरातील ज्येष्ठांना आपल्यामुळे संसर्ग होणार नाही याचीही काळजी घ्यावी, त्यादृष्टीने स्वच्छता आणि अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे असे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्या

मृत्यूदर कमी करायचा नव्हे तर तो शून्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त करतांना  यासाठी सर्दी, पडसे, खोकला, वास न येणे, चव न लागणे, यासारखे लक्षणे असल्यास त्वरित रुग्णालयात येऊन वेळेत उपचार करून  घ्यावेत असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. वेळेत रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याला वाचवणे डॉक्टरांना शक्य होते, नव्हे ते शर्थीचे प्रयत्न करतात हे ही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात फक्त ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण

मुख्यमंत्र्यांनी आजघडीला राज्यात ६५ हजार कोविड रुग्ण असून त्यातील २८ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचे व प्रत्यक्षात ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट केले. या ३४ हजार रुग्णांमध्ये २४ हजार रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही, औषोधोपचाराची गरज नाही. पण ते क्वारंटाईन आहेत. मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ९५०० आहे. १२०० रुग्ण गंभीर असून त्यापैकी फक्त २०० जण व्हेंटिलेटरवर आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असं म्हणणाऱ्यांसाठी ही आकडेवारी बोलकी आहे हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच  महाराष्ट्राला विनाकारण बदनाम केले जात असल्याबद्दल दु:ख वाट असल्याची खंत ही व्यक्त केली.

आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ

मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांमध्ये करण्यात आलेल्या वाढीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, सुरुवातीला राज्यात पुण्यात आणि कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे दोनच विषाणु प्रयोगशाळा होत्या. आजघडीला त्या ७७ आहेत, एकदोन दिवसात त्या १०० होतील. येत्या पावसाळ्यात टेस्टची संख्या वाढवणार असल्याचे सांगतांना चाचणीदर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु असल्याचे ही ते म्हणाले.

रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य असल्याचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी यात करण्यात आलेल्या भरीव वाढीची माहिती दिली. राज्यात सुरुवातील ३ हॉस्पीटलमध्ये विलगीकरणाची सुविधा होती आता २५७६ रुग्णालयात ती उपलब्ध आहे. अडीचलाख आयसोलेशनची सुविधा आणि २५००० बेडस ऑक्सीजनच्या सुविधेसह उपलब्ध आहेत.  आयसीयू बेडसची संख्या २५० हून ८५०० इतकी वाढवली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जिथे जिथे फिल्ड हॉस्पीटल ची गरज आहे तिथे ते सुरु करण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी गोरेगाव प्रदर्शन केंद्र, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससह मुंबईत उभ्या करण्यात येत असलेल्या जम्बो आरोग्य सुविधांची माहिती ही यावेळी दिली.

१६ लाख स्थलांतरित त्यांच्या राज्यात

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या अतिरिक्त रेल्वेसाठी त्यांचे आभार व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की रेल्वे आणि बसच्या माध्यमातून आतापर्यंत १६ लाख  स्थलांतरित लोक त्यांच्या त्यांच्या राज्यात गेले आहेत. २२ हून अधिक फ्लाईटसद्वारे ३ हजारांहून अधिक नागरिक परदेशातून महाराष्ट्रात आले आहेत अशी माहिती ही त्यांनी दिली. शिवभोजन योजनेअंतर्गत फक्त मे महिन्यात ३२ लाख ७७ हजारांहून अधिक थाळ्यांचे वितरण झाल्याचे त्यांनी सांगितले.

English Summary: Lockdown is relaxed but requires caution
Published on: 02 June 2020, 09:03 IST