देशातील हवामानात वेगाने बदल होत आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून अरबी समुद्राचा मध्य भाग व वायव्य भाग ते पूर्व राजस्तान सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर पूर्व राजस्थान व परिसरात चक्रीवादळासाठी पोषक स्थिती आहे.
दक्षिणेकडील दक्षिण श्रीलंका ते आंध्रप्रदेशचा भाग व उत्तर तमिळनाडू या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम थंडीवर होणार आहे. मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक व अरबी समुद्राच्या पुर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. येत्या रविवारपर्यंत राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडीत चढ-उतार असून किमान तापमानात वाढ झाली आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातही किमान तापमान १५ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. पुढील आठवडाभर राज्यात थंडी कमी -अधिक स्वरुपाची राहणार आहे.
Published on: 06 January 2021, 11:23 IST