राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र आज आणि उद्या कोकणातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात आजपासून पुढील तीन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. शुक्रवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही प्रमाणात ढगाळ हवामान असणार आहे, पण गुरुवारपासून तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्यप्रदेशात असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहिल. सध्या तामिळनाडूच्या दक्षिण उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसापटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम राजस्थानच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे रुपांतार चक्राकार वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. मॉन्सूनची आस असलेला पट्टा उत्तर भारातापासून मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे या भागात परतीच्या पावसासाठी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान घाटमाथ्यावर हलक्या पावसाची संततधार सुरू होती. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार स्वरुपचा पाऊस झाला. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इतर भागात ढगाळ हवामानासह पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. तर नगर, सोलापूर, खानदेशातही पावसाचा दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे.
Published on: 01 September 2020, 10:12 IST