News

मुंबई: लॉकडाऊननंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्तींसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले असून २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने जारी करण्यात आल्याचे उद्योग विभागाने कळविले आहे.

Updated on 28 April, 2020 9:02 PM IST


मुंबई:
लॉकडाऊननंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्तींसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले असून २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने जारी करण्यात आल्याचे उद्योग विभागाने कळविले आहे.

केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले व काही अटी शर्थींवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभागाने उद्योग सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली आहे. परवाने मिळवण्यासाठी आतापर्यंत २५ हजार अर्ज दाखल झाले असून अटी व शर्थींचे पालन करणाऱ्या सुमारे १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने अदा करण्यात आले आहेत.

उद्योग सुरू करताना सामाजिक अंतर राखणे, कामगारांची कंपनी किंवा कारखान्याच्या आवारात राहण्याची सोय करणे, कामगारांचे दळणवळण टाळणे आदी सूचनांचे पालन करणाऱ्यांनाच परवाने दिले जात आहेत. वरील सूचनांचे पालन करण्याची तयारी असलेल्या उद्योगांना आतापर्यंत परवानगी दिली जात आहे. दरम्यान, १७ एप्रिलपूर्वी सुमारे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ६ हजार ५८९ उद्योगांना परवाने दिले आहेत.

दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, यासह बारा महानगरपालिका क्षेत्रात जिथे रेड झोन आहे, त्या ठिकाणी अद्याप उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. उद्योग सुरू होणे काळाजी गरज आहे. यामुळे उद्योगचक्राला गती मिळेल, शिवाय कामगारांना रोजगार मिळेल, असा आशावाद उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला.

English Summary: Licenses to 13,448 industries after lockdown relaxes
Published on: 28 April 2020, 09:02 IST