News

मुंबई: कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता, आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही.

Updated on 08 May, 2020 10:16 AM IST


मुंबई:
कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता, आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही.

सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले. ते आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून आणि इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांतून सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, आज कोरोनाशी मुकाबला करीत असताना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवित असतो. केंद्र सरकारसुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आतापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण प्रसंगी टीका करीत असाल, पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करण्याचा असतो.

कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे मात्र  बीकेसी, वरळी, रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. व्हेंटिलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणेकरून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय संस्था, लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आम्ही आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे अशीही माहिती त्यांनी दिली. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेटमेंट झोन्स मध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.

पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती - उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लागावा यासाठी चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

नेत्यांनी केल्या विविध सूचना

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सूचना केल्या. मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे असे सांगितले. गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे तसेच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल असे सांगितले. कोविड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णांना बेड्सची व इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे तसेच  प्रशासनात समन्वय हवा तो घडवून आणणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. परराज्यातील २०-२५ हजार श्रमिक पायी घरी निघाल्याचे चित्र आहे. केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत, पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे असे ते म्हणाले.

English Summary: Let's fight together to get out of the Corona crisis
Published on: 08 May 2020, 10:11 IST