लातूर: जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलसंवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. आता भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार, भूकंपग्रस्तांच्या नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्लारी येथे दिला.
प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील व इतर मान्यवरांनी भारतीय जैन संघटनेकडून जलयुक्त शिवारच्या कामासाठी देण्यात येणाऱ्या मशीनचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन निर्धार समारंभाची सुरुवात झाली.
1993 मध्ये झालेल्या भूकंपाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून या वेळी आपलं सर्वस्व गमावलेल्या लोकांसोबत संवेदना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्या आपत्तीच्या परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी यांनी चांगले काम केले होते, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी पुनर्वसनाचे मोठे काम करण्यात आले. परंतु त्याबाबतचे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यापैकी कुटुंबामध्ये झालेल्या वाढीव सदस्यांमुळे त्यांना आवश्यक असेल तर घर किंवा जागा देण्यात येईल त्याचबरोबर त्यावेळी पुनर्वसनासाठी जमिनी दिलेल्या लोकांनाही जागा अथवा इतर मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबविल्या जात होत्या, या भागाचे पुनर्वसन होत असतानाही येथेही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरू केला परंतु काही कारणांनी या योजना बंद झाल्या. त्या सर्व योजना पुन्हा सौरऊर्जेच्या मदतीने कार्यान्वित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील नदी, नाले, तलाव, धरणातील गाळ काढणे व इतर जलसंधारणाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केल्यास कमीत कमी पावसातही गावे जलपरिपूर्ण होऊ शकतात. मागील वर्षी बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाला परंतु जलयुक्तच्या कामांमुळे पिकांना संरक्षित सिंचन मिळाल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या कामांमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पाणी पातळीत किमान चार मीटरने वाढ झालेली आहे तर या भागातील टॅंकरची संख्या 85 टक्क्याने कमी होऊन टंचाईग्रस्त गावांची संख्याही 75 टक्क्यांनी कमी झाली आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या मनोगतात 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपाची माहिती घेतल्यानंतर तातडीने सकाळी सात वाजता किल्लारी येथे पोहोचलो. यावेळी प्रथम काम केले ते मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अंत्यविधी करणे व दुसरे काम केले ते जखमी लोकांना तत्काळ उपचार मिळवून देणे, अशा आठवणी सांगितल्या. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: येथे उपस्थित राहून येथील मदतकार्याच्या कामाला शिस्त लावली. त्यानंतर दहा दिवसात येथील लोकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून एका महिन्याच्या आत सर्वांना शेडचे घर उपलब्ध करून दिले. भूकंपाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने व इतर संघटनांनी जेवढी मदत केली तेवढेच मदतकार्य या भागातील लोकांनीही केले होते. या धक्क्यातून बाहेर पडण्याचे काम याच लोकांनी केल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.
यावेळी भारतीय जैन संघटना व त्यांचे पदाधिकारी तसेच किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच शैलाताई लोहार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपस्थित इतर मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व फोटो फ्रेम देऊन सत्कार केला. या समारंभाचे सूत्रसंचालन सुनील कोचेटा व प्रकाश दगडे यांनी केले तर आभार अभय शाह व किल्लारी गावचे उपसरपंच अशोक पोतदार यांनी मानले.
Published on: 01 October 2018, 10:48 IST