डॉ. आदिनाथ ताकटे
Rabbi Season Update : बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने दिलेली हुलकावणी, जुलै महिन्यात उशिराने झालेल्या खरीपाच्या पेरण्या, खरीप पिकांच्या सोयाबीन , कापूस काढणीस झालेला विलंब, त्यामुळे गहू लागवडीस यंदाच्या वर्षी उशीर होत आहे. त्याच बरोबर ऊस तोडणीनंतर , गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते.महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास ३० टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी पडलेला अपुऱ्या पावसाने गहू लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.
बागायत उशिरा पेरणीची शिफारसही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे.मात्र काही शेतकरी १५ डिसेंबर नंतरही गव्हाची पेरणी करतात.वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते. गव्हाच्या पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते.गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्लू-१९९४), निफाड ३४ एनआयएडब्लू-३४ किंवा एकेएडब्लू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या ह्प्त्यासह दोन चाद्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ से.मी.अंतरावर पेरावे. पेरणी करते वेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (९०:६०:४० नत्र:स्फुरद :पालाश किलो प्रती हेक्टरी ) म्हणजेच ९८ किलो युरिया (सर्वसाधारणपणे दोन गोण्या युरिया ) ३७५ किलो सिंगल सिंगल सुपर फॉसपेट (सर्वसाधारणपणे ७.५ गोण्या एसएसपी ) व ६७ किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश (सर्वसाधारणपणे १.५ गोणी एमओपी) दयावे. उर्वरित नत्राचा हप्ता ९८ किलो युरिया (सर्वसाधारणपणे दोन गोण्या युरिया) खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी दयावा.
गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅकटर व २५० ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ से.मी खोल करावी.त्यामुळे उगवण चांगली होते.पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता ती एकेरी करावी.म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यानी खुरपणी करावी.पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही.पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर,वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.
जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी दयावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा.तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसा दरम्यान दयावे.बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.
जर एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल,तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी गव्हास पाणी दयावे. दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी दयावे.तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी २० ते २२, दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी दयावे.अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाचे ऊत्पादन घ्यावे.
Published on: 20 November 2023, 10:24 IST