निम्न दुधना प्रकल्प मधील 100 टक्के पाणीसाठा झाला असून त्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्र मर्यादेच्या बाहेरील असंपादित जमीन नक्षत्रात पाणी आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे नुकसान होणारे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न हा चांगलाच ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त वांजोळा आणिविडोळी येथील शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली होती.या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या ढोल ताशा आंदोलन सुरू केले होते.
या पार्श्वभूमीवर भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे कार्यालयातर्फे करण्यात येत आहे, असे लेखी आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या समोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर्त आंदोलन स्थगित केले.
यावेळी शेतकर्यांनी मागणी केली होती की, निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा 50 टक्के खाली करून त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमीन संपादित करा.
त्याची मोजणी करून अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नावर बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा, मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. कोरके यांच्या सहीनिशी भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले.(स्त्रोत-ॲग्रोवन)
Published on: 28 January 2022, 09:58 IST