नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात प्रमुख पीक असलेल्या भात आणि नागलीसह खरीप हंगामात २५ हजार ४११ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची कामे सुरू आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिमेस गुजरात राज्यांच्या सीमेवर वसलेल्या पेठ तालुक्यात भात व नागली ही दोन प्रमुख खरीप पिके घेतली जातात. जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक सरासरी पर्जन्यमान असले तरी गत अनेक वर्षांपासून पावसाच्या अस्थिरतेमुळे सरासरी पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येत असल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. भात व नागली या दोन पिकांसाठी पेरणीपूर्व मशागतीची दोन भागात विभागणी केली जात असल्याने राब भाजणी या पेरणीपूर्व तयारीत आदिवासी बळीराजा गुंतला आहे.
भात व नागलीची पेरणी करण्यापूर्वी जमीन भाजून तणविरहीत केली जाते. पहिल्या पावसा सोबत याच राव भाजलेल्या जागेत भात व नागलीची पेरणी केली जाते.सध्या शिवारात पालापाचोळा, गवत, गोवऱ्या, वाळलेल्या झाडांच्या फांद्या टाकून राब भाजली केली जात आहे. 'यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज असल्याने पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी खरीप कृती आराखडा तयार केला असून खते, बियाणे बांधावर पोहचण्याचा मानस केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन उत्तम शेती करावी' - अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी,पेठ
खरीप पीक निहाय पेरणी उद्दिष्ट (हेक्टरमध्ये)
भात - ११ हजार ७११
नागली - ५ हजार ७५५
वरई - १ हजार ६९६
तूर - ९६३
उडीद - १ हजार ९९९
कुळीद - १ हजार ०९२
भुईमूग - १ हजार ५९५
खुरसणी - ६००
Published on: 08 May 2021, 07:06 IST