कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रविकास योजनेतून आपल्याला फायदा होईल अशा आशेने शेतकऱ्यांनी आपल्याकडील पैसा शासनाच्या योजनेत गुंतवला परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजून मिळेला नाही. गेल्या एक वर्षापासून शेतकरी या योजनेच्या पैशांची वाट पाहत आहेत. दरम्यान यासाठी शेतक-यांची शाश्वत शेती विकास योजनेचे पैसे तात्काळ आदा करावे या मागणीसाठी पप्पूशेठ धोदाड याच्या नेतृत्वाखाली कुंभेफळ ग्रामस्थ सोमवारी ६ जुलैला सकाळी उपोषण करणार आहेत.
याबाबत कुंभेफळ ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभेफळ गावाची राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्रविकास या योजनेत २०१९ या वर्षासाठी निवड करण्यात आली होती. कोरडवाहू क्षेत्रविकास योजनेंतर्गत नेमलेल्या समितीच्या समक्ष गावातील लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० / १२ / २०१ ९ रोजी दुग्धसंकरीत गाईचे खरेदी केले. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६०-८० हजारांची गुंतवणूक केली आहे, व लाभार्थी म्हणून शासनाकडून २०,००० रु . लाभ हा मिळण्यासाठी गेल्या ८ महिन्यापासून लाभार्थी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. वेळोवेळी तोंडी विनंती केली, पाठपुरावाही केला तरीही शासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. बहुतांश लाभार्थी शेतकऱ्यांनी गाई खरेदीसाठी वापरलेली रक्कम ही व्याजाने काढलेली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. सदरील समस्याची दखल शासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुंभेफळ गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत अन्यथा नाईलाजास्तव कर्जत तहसिल कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल असे म्हटले आहे.
या योजनेतील सर्व लाभार्थी गाई- गुरांसकट सामाजिक अंतर ( Social Distancing ) तसेच मास्क चा वापर करून आमरण उपोषण करणार आहेत. या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पप्पू धोदाड, सरपंच काकासाहेब धांडे, अहमदनगर धोदाड, बाळासाहेब पाटील, शांतीलाल वांळूजकर, युसूफ शेख, बबन उकिरडे, बिभीषण शिंदे, ज्ञानदेव धोदाड, आबासाहेब धोदाड, बाळासाहेब धोदाड आदींच्या सहया आहेत.
Published on: 05 July 2020, 08:11 IST