सध्या साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगाम सुरू असून या वर्षी उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने हा गाळप हंगाम लांबेल अशी चिन्हे आहेत.त्यातच त्या त्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप होईल याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
त्यातच करमाळा तालुक्यातील कमला भवानी साखर कारखाना त्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस सोडून बीड आणि गेवराई सारख्या ठिकाणच्या उसाचे गाळप होत असल्याने संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस वाळून चालला असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे करमाळा तालुका अध्यक्ष ऍडवोकेटशशिकांत नरुटे यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. याबाबतीत नरुटे म्हणाले की, साखर कारखानदारांना ऊस गाळप परवाना हा कारखाना कार्यक्षेत्र व लाभ क्षेत्रातील उसाच्या नोंदीवरून दिला जातो. परंतु कार्यक्षेत्रातील ऊसच गाळपास नेला जात नसेल तर हे कारखान्याचे गैरकृत्य तहसीलदार, जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.
यामध्ये उसाचे 265 वाण असलेल्या उसाची नोंद नोव्हेंबर 2021 पर्यंत घेण्याचे आदेश साखर आयुक्तांचे कारखानदारांना होते. परंतु अजूनही शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित साखर कारखानदार लाभ क्षेत्राबाहेरील उस कमी दराने गाळपासाठी आणत आहेत त्यामुळे कारखान्याच्या जवळचे ऊस तोड न झाल्याने शेतातच वाळून चालले आहेत तसेच बऱ्याच उसाला तुरे देखील आले आहेत. कारखान्यातील लाभक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे व कारखानदाराने घोषित केलेला दर हा द्यावा लागतो. मात्र कारखाना कार्यक्षेत्र व लाभक्षेत्र सोडून बीड गेवराई तसेच भूम इत्यादी ठिकाणाहून 1700 ते 1800 रुपये दराने ऊस आणून गाळप केला जात आहे.
त्यामुळे अनेक लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस पूर्वहंगामी व आडसाली उसाचा तोडण्याचा कालावधी होऊन गेला आहे. परिणामी कारखान्याच्या अगदी जवळ असलेला ऊस हा वाळून चाललेला आहे. कारखान्याने हा प्रकार त्वरित थांबवावा व करमाळा तालुक्यातील लाभ क्षेत्रातील ऊस गाळप करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. वेळ पडली तर बाहेरून आणलेल्या उसाची वाहने अडवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असेही ते म्हणाले.(संदर्भ स्त्रोत- सकाळ)
Published on: 14 February 2022, 04:44 IST