मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसाला एसटी महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार मृत्यू झालेल्या ३५ आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.
परंतु ३५ पैकी सहा जणांनी एसटीतील नोकरीत स्वारस्य दाखविले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर १२ आंदोलकांच्या वारसांना एसटीत नोकरी देण्याचा निर्णय लवकरच एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेकांनी आपला जीव गमावला. आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका वारसाला एसटीत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये एसटी महामंडळाने घेतला.
वारसदार सज्ञान नसल्यास व शिक्षण घेत असल्यास त्याच्या वयाची २५ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या नेमणुकीचा हक्क राखून ठेवता येईल. परंतु त्याकरिता कुटुंबाने सदरचे परिपत्रक प्रसारित झाल्यापासून एक वर्षांच्या आत तसा अर्ज सादर करणे आवश्यक आहे असेही नमूद केले. यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर प्रत्यक्षात वारसांची माहिती पोलीस व अन्य यंत्रणांमार्फत महामंडळाला मिळेपर्यंत काही कालावधी गेला. त्यानंतर नोकरी देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३५ आंदोलकांच्या वारसांपैकी १० जणांना एसटीत शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरी देण्यात आली आहे. तर काही तांत्रिक मुद्यांमुळे सहा जणांचा अर्ज राखून ठेवण्यात आला आहे. एका उमेदवाराची माहिती मिळत नसल्याचे सांगितले. याशिवाय एसटीतील नोकरीत आणखी सहा जणांनी स्वारस्य दाखविलेले नाही. एसटीची आर्थिक स्थिती, कमी वेतन, अन्यत्र मिळालेली नोकरी इत्यादी कारणे ही नोकरीत स्वारस्य नसल्यामागील असल्याचे सांगितले.
७ जणांचे अर्ज नाकारले
३५ आंदोलकांच्या वारसांना एसटीत नोकरी देण्यासाठी प्रयत्न होत असतानाच आणखी सात जणांचे अर्जही आले होते. परंतु त्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध नसल्याने ते अर्ज नाकारण्यात आले. मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या काही वारसांना नोकरी मिळाली आहे. आता एसटीत विविध पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार आणखी बारा जणांना नोकरी देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
Published on: 15 October 2021, 11:38 IST