New Delhi : देशातील 31 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रुंखला पुरस्कार 2023 साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सात उत्तम जीवन रक्षा पदक आणि 21 पराक्रमी व्यक्तींना जीवन रक्षा पदकाचा समावेश आहे. यात तीन पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येतील.
जीवन रक्षा पदकासाठी राज्यातून आदिका राजाराम पाटील, प्रियंका भारत काळे व सोनाली सुनील बालोडे या तीन महिलांची निवड झाली आहे.
एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो.
सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हे पुरस्कार मरणोत्तर देखील दिले जातात. या पुरस्काराचे स्वरुप (पदक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि एकरकमी आर्थिक भत्ता) पुरस्कार विजेत्याला केंद्रीय मंत्रालय/ संस्था/ राज्य सरकारद्वारे प्रदान केले जातात.
Published on: 26 January 2024, 02:35 IST