Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार कमी भाव, कापूस उत्पादक शेतकऱ्याचे झालेले नुकसान अशा विविध मुद्द्यांवरुन जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला आहे. तसंच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, निचांकी बाजारभाव शेतमालाला दिला जातोय, असंही पाटील म्हणाले आहेत.
राज्य आणि केंद्र सरकारने मराठवाडा, विदर्भातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, इतका नीचांकी बाजारभाव शेतमालाला दिला जातोय. तसंच राज्यात परतीचा पाऊस देखील समाधानकारक झालेला नाही, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांकडून जास्तीच्या उत्पादनाची अपेक्षा नाही, असंही पाटील म्हणालेत.
देशातील कापूस उत्पादन २००९-१० नंतर पहिल्यांदाच या पातळीवर पोहोचल्याचे पाटील म्हणाले. शेतकरी संकटात सापडलेला असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र प्रचार करण्यात व्यस्त आहेत, हे दुर्दैव आहे, असं पाटील म्हणालेत.
दरम्यान, जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.
Published on: 02 November 2023, 10:45 IST