News

जळगाव: पाण्याचे महत्त्व, त्याचे मोल सर्वच धर्मांमध्ये सांगण्यात आलेले आहे. पाण्याबाबतची शिकवण पुरातन काळात सांगण्यात आलेली आहे परंतु जगभरातील माणूस पाण्याचा वारेमाप वापर करतो, त्यामुळे पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालेला आहे.

Updated on 21 September, 2019 8:37 AM IST


जळगाव:
पाण्याचे महत्त्व, त्याचे मोल सर्वच धर्मांमध्ये सांगण्यात आलेले आहे. पाण्याबाबतची शिकवण पुरातन काळात सांगण्यात आलेली आहे परंतु जगभरातील माणूस पाण्याचा वारेमाप वापर करतो, त्यामुळे पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालेला आहे. पाण्याबाबत जैन इरिगेशनने शहरातील शाळांमध्ये जल संरक्षण अभियान हा स्तुत्य उपक्रम सुरू केल्यामुळे पाणी बचतीचा संदेश शहरातील प्रत्येक घरात पोहोचेल असे विचार खोटे नगर येथील मानव सेवा संस्था विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. राणीदासजी डाकलिया यांनी व्यक्त केले.

20 व 21 सप्टेंबर दरम्यान जल संरक्षण अभियानाच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिशुविकास विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मुक्ता पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. माया आंबटकर आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सूर्यवंशी, जैन इरिगेशनचे सहकारी आनंद पाटील व किशोर कुलकर्णी उपस्थिती होते.जैन इरिगेशनचे संस्थापक स्व. डॉ. भवरलालजी जैन यांनी आपले अवघे आयुष्य पाण्यासंदर्भात कार्यात वाहून घेतले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त शेतजमीन भिजविण्याचे ठिबक सिंचन तंत्र लाभले.

पूर्वीच्या पाट-चारी पद्धतीमध्ये अनमोल असे पाणी वाया जायचे परंतु ठिबक सिंचनामुळे जगभरातील शेतकरी दररोज लाखों लिटर्स पाणी वाचवित आहेत. पाण्यासंदर्भात शहरात सुरू झालेल्या या अभियानामुळे सगळ्यांमध्ये सजगता येईल यात शंका नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंप्राळा परिसरातील अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाही ही बाब आमच्या लक्षात आल्यावर या परिसराचा सर्व्हे करून ज्या नळांना तोट्या नाहीत त्या नळांना शाळेकडून मोफत तोट्या बसवून दिल्या गेल्या. शाळेत रेन वॉटर हार्वेस्टचा उपक्रम राबविणारी आमची शाळा असा गौरव देखील करण्यात आलेला आहे असे ही डॉ. डाकलिया म्हणाले.

मान्यवरांच्या हस्ते कुडींतील रोपाला पाणी देऊन तसेच सरस्वती पूजनाने या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उपक्रम नेमका काय आहे याबाबत किशोर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या अभियानाचे पोस्टर्स तयार करणारे आर्टिस्ट आनंद पाटील यांनी जलबचतीबाबत विद्यार्थ्यांशी दैनंदिन जीवनाचे दाखले देत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी उपस्थितांसह विद्यार्थ्यांना जल बचतीची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. रत्ना चोपडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक दाभाडे सर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

English Summary: Jain Irrigation Water Conservation Campaign launched in Human Services Institute
Published on: 21 September 2019, 08:30 IST