News

सिंधुदुर्ग: परंपरागत शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या व यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने कृषि उत्पन्न दुप्पट होण्यासाठी जय जवान जय किसान ही योजना सिंधुदुर्गात राबविली जाईल. तसेच यंदाचे वर्ष विविध विकास कामांच्या अंमलबजावणीचे स्वप्नपूर्तीचे वर्ष म्हणून काम करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ध्वजारोहणानंतर मार्गदर्शनपर भाषणात केले.

Updated on 15 August, 2018 7:41 AM IST

सिंधुदुर्ग: परंपरागत शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या व यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने कृषि उत्पन्न दुप्पट होण्यासाठी जय जवान जय किसान ही योजना सिंधुदुर्गात राबविली जाईल. तसेच यंदाचे वर्ष विविध विकास कामांच्या अंमलबजावणीचे स्वप्नपूर्तीचे वर्ष म्हणून काम करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ध्वजारोहणानंतर मार्गदर्शनपर भाषणात केले. स्वातंत्र्यादिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अप्पर पोलीस अधिक्षक निमीत गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते. 

जय जवान जय किसान या योजनेखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व कृषि औजारे वापराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणा बरोबरच आधुनिक कृषि औजारेही पुरविली जाणार आहेत. देशातील सैनिका प्रमाणेच शेतीत राबणारा शेतकरी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, चांदा ते बांदा, कोकण ग्रामीण पर्यटन बाबतचे आराखडे पूर्ण झाले असुन आता याची अंमलबजावणीसाठी यंदाचं वर्ष म्हणजे संकल्प वर्ष म्हणून या सर्व योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ते पुढे म्हणाले, पर्यटनातून ग्रामपंचायती अधिक आर्थिक सक्षम होतील यासाठी ग्रामपंचायतींनी आपल्या गावाच पर्यटनदृष्ट्या सर्वेक्षण करुन प्रस्ताव सादर करावेत. 

गेल्या चार वर्षात जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातील 113 गावे स्वयंपूर्ण होण्या बरोबरच जिल्ह्यातील 683 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत झाली असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी आता श्री पध्दतीने भात लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवृत्त होत आहे. गतवर्षी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर असणारी श्री पद्धतीची भात लागवड यंदाच्या खरीप हंगामात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर पोहचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पासून सुरु होत असलेल्या युवा माहिती दूत उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवक-युवती व नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच ऑगस्ट अखेर सुरु असलेल्या स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण अंतर्गत SAG18 हे ॲप मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी डाऊनलोड करुन या अभियानात जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

English Summary: Jai Jawan Jai Kisan Scheme for Agricultural Mechanization : Guardian Minister Deepak Kesarkar
Published on: 15 August 2018, 07:40 IST