राज्यात सर्वत्र खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन ला खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. यावर्षी मात्र शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला. यासाठी कृषी विभागाने देखील शेतकरी बांधवांना सल्ला दिला होता.
बिगर हंगामी सोयाबीन मात्र, अजूनही फुलोरा अवस्थेत आलेले नाही. तसेच यासाठी अतिरिक्त खतांच्या मात्रा देखील शेतकरी बांधवांना द्यावे लागत आहे. काही ठिकाणी उन्हाळी हंगामातील सोयाबीन फुलोरा अवस्थेत आले आहे मात्र अशा सोयाबीनवर फुलकळीचे प्रमाण मात्र 30 ते 40 टक्के एवढेच आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीनची अशी परिस्थिती बघता आता यातून उत्पादन खर्च निघेल का नाही याबाबत शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत आहेत.
खरीप हंगामातील सोयाबीन ला या वर्षी सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव बघायला मिळाला. यामुळे गदगद झालेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात देखिल सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला. औरंगाबाद जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन ची लागवड बघायला मिळत आहे. खरिपात झालेल्या मनसोक्त पावसामुळे सध्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवडीचा प्रयोग झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र उन्हाळी हंगामात लावलेला सोयाबीनला अजूनही फुलकळी लागलेले नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी 100 दिवसाच्या वाणाची लागवड केली आहे, त्या सोयाबीनला आता 45 दिवस उलटूनही फुलकळी लागलेली नाही. 120 ते 140 दिवसात काढणीसाठी तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाला देखील आता जवळपास सत्तर दिवस उलटत आले मात्र अद्यापही या सोयाबीन वाणाला अपेक्षित अशी फुलकळी लागलेले नाही त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडला आहे.
उन्हाळी हंगामातील सोयाबीन पेरणीला आता निम्म्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे तरी देखील सोयाबीनला अपेक्षित अशी फुलकळी लागलेले नाही. काही ठिकाणी सोयाबीनला फुलकळी लागली आहे मात्र 30 ते 40 टक्केच फुलकळी बघायला मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून सोयाबीन पिकात नागर घालण्याच्या मनस्थितीत आला आहे. काही शेतकरी सोयाबीन कापून जनावरांसाठी चारा म्हणून उपयोगात आणत आहेत.
विशेष म्हणजे उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी कृषी विभागाने देखील शेतकरी बांधवांना प्रोत्साहित केले होते. मात्र आता उन्हाळी सोयाबीन पिकातून शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असून आता याबाबत तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न आता त्यांना भेडसावू लागला आहे.
संबंधित बातम्या:-
शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग! स्ट्रॉबेरीचे घेतले यशस्वी उत्पादन; लाखो रुपये उत्पन्नाची आशा
शेतकऱ्यांमागची साडेसाती कधी संपेल! आता टोमॅटोचे दर घसरल्याने; टोमॅटो उत्पादक अडचणीत
Published on: 28 March 2022, 05:43 IST