अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात महावितरण कंपनीकडून वीजपंपांना रात्रीचा वीज पुरवठा केला जात आहे. रात्रीचा वीज पुरवठा असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यायला रात्रीचे जावे लागत आहे. आत्ता सध्या कडाक्याची थंडी आहे. त्याचबरोबर अनेक गावांमध्ये बिबट्यांचा संचार आहे. महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहतेय का? असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे व शेतकऱ्यांनी केला आहे.
किसान मोर्चाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे म्हणाले की, महावितरण कंपनीकडून कृषी वीजपंपांना पूर्वी आठ तास वीजपुरवठा केला जायचा. मात्र, सध्या कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून तो देखील रात्रीच्या वेळी करण्यात येतो. त्यामुळे कृषी पंप निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीतकृषी वीजपंपांचे वारंवार नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही वाढला आहे.
रात्री वीज पुरवठा होत असल्याने रात्रीच पिकांना पाणी द्यायला जावे लागते. सध्या राज्यात थंडीची लाट आहे. रात्री बिबट्यांची भीती अधिक आहे. त्यामुळे कृषी वीजपंपांना दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा. थकीत वीज देयके भरा अन्यथा विद्युत रोहित्र बंद करू, असे धमकावण्याचे काम केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारने यावर मार्ग काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Published on: 17 January 2022, 12:24 IST