देशासह जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगातील अनेक देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. आपल्या देशातही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दोन हजारांच्या वरती गेली आहे. तर या विषाणूमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या ५६ झाली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने मानवी संक्रमणापासून पसरतो, यामुळे सोशल डिस्टंसिग हाच सध्या तरी उपाय आहे. दरम्यान सुरुवातीच्या काळात या विषाणू विषयीच्या बातम्या प्रसारित होत असताना एका बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ती बातमी होती परदेशात कोरोनामुळे एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याची. त्यानंतर नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होऊ लागली होती. परंतु प्राण्यांपासून हा विषाणू पसरत नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.
हॉँगकाँगमध्ये एका १७ वर्षाच्या पॉमेरियन जातीचा कुत्रा कोरोनामुळे मृत पावला. या कुत्र्याला त्याच्या मालकीणीपासून कोरोनाचा लागण झाली होती. दरम्यान त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाल्या होत्या. परंतु कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यापासून कोरोनाचा प्रसार होतो याविषयीचे कोणतेच पुरावे नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे अनेक कुत्रा पाळणाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. शेती करणारे किंवा पशुपालन करणारे गुरे चराई करणारे, मेंढ्याचे पालन करणारे धनगर समाजाचे लोक कुत्रा पाळत असतात. गुरे चराई आणि मेंढीपालन करणारे लोक जंगलात चराईसाठी जातात. त्यामुळे आपल्या आणि पशुंच्या रक्षणासाठी कुत्रे पाळत असतात. भारतात अनेक प्रजातीचे कुत्रे सध्या आढळतात. इंडियन मस्तीफ, राजापलायम, कन्नी, इंडियन परिह, जेरमन शेफर्ड, मुधोल हाउंड आदी जातीचे कुत्रे आढळतात.
दरम्यान हा विषाणू इम्युनिटी कमी करत असतो. आपल्या शरिरातील श्वसन क्षमता बाधित करत असतो. यामुळे आपण प्रतिबंधात्मक उपाय केलेले चांगले असते. आपल्या शरिरात इम्युनिटी असते तशीच ती प्राण्यांमध्ये ही असते, त्याची क्षमता कशी असते. इतर जातीच्या कुत्र्यांमध्ये इम्युनिटी कशी असते याची आपण माहिती घेणार आहोत. याविषयावर कृषी जागरण मराठीशी बोलताना क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. सागर अशोक जाधव यांनी आपले मत मांडले आहेत. डॉ. सागर जाधव यांच्यामते 'परदेशात कोरोनामुळे मृत पावलेल्या कुत्र्यामधील इम्युनिटी ही आपल्याकडील कुत्र्यांच्या मानाने कमी असते. कुत्र्याचे वय अधिक असल्याने त्याच्यातील इम्युनिटी कमी झाली असावी. याचे एक अजून एक कारण असू शकते, पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला १४ दिवस विलगीकरण करण्यात आले होते. मालकापासून दूर राहिल्याच्या तणावामुळेही त्याचा मृत्यू झाला असावा. दरम्यान पाळीव प्राण्यांकडून कोरोनाचा प्रसार होत नसल्याचेही डॉ. जाधव म्हणाले.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे -
१.प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या कुत्र्यांना पूर्ण व संतुलित, उत्तम दर्जाचे खाद्य द्यावे. त्यामध्ये प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करावा तसेच उत्तम दर्जाचे चिकन व बीफ द्यावे.
२.कुत्र्यांच्या लाईफ स्टेज नुसार लागणारे खाद्य योग्य प्रमाणात द्यावे.
३.कुत्र्यांना मुबलक प्रमाणात स्वच्छ व ताजे पाणी उपलब्ध करून द्यावे.
४. कुत्र्याकडून रोज योग्य प्रमाणात व्यायाम करून घ्यावा की ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. दरम्यान करोनाचा प्रसार प्राण्यांमुळे होत असल्याचे पुरावे नाहीत,’ असे पशुवैद्यकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्राणी हाताळल्यावर हात स्वच्छ धुणे आवश्यक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
प्राण्यांना हात लावल्यानंतर, खाणे घातल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. प्राण्यांचा वावर असलेल्या जागा स्वच्छ ठेवाव्यात. त्यांना फिरवायला नेल्यानंतर प्राणी चुकीच्या गोष्ट खाणार किंवा चाटणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाळीव प्राणी असलेले मांजर व कुत्रा यांच्याद्वारे मानवाला कोरोना
विषाणूची लागण होऊ शकत नाही. मात्र, ते या विषाणूंच्या संपर्कात आल्यास त्यांच्यात तो कमी प्रमाणात आढळण्याची शक्यता आहे.
कोरोना आजाराविषयी योग्य माहिती, सोशल डिस्टंसिग, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण कोरोनावर मात करु शकतो, असे सहायक प्राध्यापक डॉ. सागर जाधव म्हणाले. - ( क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, सातारा)
Published on: 03 April 2020, 09:54 IST