Budget 2024 News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.१) रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदा लोकसभेच्या निवडणुका असल्याने यावेळी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी विकासाशी संबंधित अनेक मुद्यांवर यावेळी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेपासून अक्षय ऊर्जेपर्यंत अनेक मोठ्या घोषणा आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा संक्षिप्त स्वरुपात :
१) जिल्ह्यांमध्ये विकास
देशातील विकासाच्या प्रवासात महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे.
२) प्रधानमंत्री आवास योजना
पीएम आवास योजना-ग्रामीणच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे. आवास योजने अंतर्गत तीन कोटी घरे बांधली जातील. त्यापैकी दोन कोटी घरे येत्या पाच वर्षांत बांधण्यात येणार आहेत.
३) रूफटॉप सोलर एनर्जी
पीएम मोदींच्या महत्त्वाकांक्षी सूर्योदय योजनेशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. या योजनेवर लवकरच काम केले जाईल. या माध्यमातून एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळू शकणार आहे. यामुळे १५-१८ हजार रुपयांची बचत होणार आहे.
४) ई-वाहन चार्जिंग
मोठ्या प्रमाणावर ई-वाहन चार्जिंग स्टेशन्सची स्थापना केली जाईल. यामुळे विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे.
५) मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण
मध्यमवर्गीयांसाठी योजना तयार केली जाईल. भाड्याची घरे, झोपडपट्ट्या आणि अनियमित घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना नवीन घर विकत घेण्याची किंवा बांधण्याची संधी मिळणार आहे.
६) वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती
आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा वापर करून सरकार आणखी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार आहे.
७) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस
आमचे सरकार ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरण करणार आहे.
८) मातृत्व आणि बाल विकास
त्यासाठी सर्वसमावेशक योजना आखण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. पोषण २.० ची अंमलबजावणी जलद केली जाणार आहे. तसंच लसीकरण बळकट केले जाईल.
९) आयुष्मान भारत
सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना त्याच्या कक्षेत आणले जाणार आहे.
१०) लखपती दीदी
नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या ८३ लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तिच्या यशामुळे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे. ते इतरांसाठी प्रेरणास्थान आहेत. लखपती दीदींसाठीचे लक्ष २ कोटींवरून ३ कोटी रुपये करण्याचे आम्ही ठरवले आहे.
Published on: 01 February 2024, 01:05 IST