अमरावती : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा अंतर्गत संत्रा पिकाचा आंबिया बहारासाठीच्या विमा हप्ता दरात तिप्पट वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांकडून भरपाईसाठीचे निकष त्यांच्या हिताचे निश्चित केले आहेत.
त्यामुळेच नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना भरपाईसाठी ताटकळतच राहावे लागते, असा आरोप सातत्याने होतो. असे असताना २०२१-२२ या वर्षात पंतप्रधान पीकविमा योजनेतून संत्र्याच्या आंबिया बहारासाठीच्या विमा हप्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.
दरवर्षी विमा हप्ता म्हणून हेक्टरी 4 हजार रुपयांचा भरणा करावा लागत होता. यावेळी मात्र यात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना हेक्टरी १२ हजार रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. यापूर्वी हेक्टरी ४ हजार रुपयांचा भरणा करून संरक्षित रक्कम ८० हजार रुपये होती. शेतकरी हिस्सा १२ हजार रुपये करण्यात आल्यानंतर देखील संरक्षित रक्कम ८० हजार रुपयेच मिळणार आहे. तसेच गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १३३३ रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे वेगळी रक्कम भरावी लागणार आहे.
जिल्हानिहाय बदलतो हप्ता
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ हजार, अकोला जिल्ह्यात चार हजार तर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० हजार रुपये याप्रमाणे प्रतिहेक्टरी विमा हिस्सा भरावा लागणार आहे. जिल्हानिहाय एकाच पिकांकरिता वेगवेगळा विमा हप्ता निश्चित करण्यात आल्याने देखील शेतकरी संभ्रमात आहेत.
Published on: 23 August 2021, 08:09 IST