Unseasonal Rain News : वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, तूर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढलेला आहे. मात्र विमा कंपन्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने आणि विमा कंपनीचे अधिकारी पाहणी करण्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होताना दिसत आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे.
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तूर आणि कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तसंच तूरीचा बाहर देखील पावसात गळून गेला आहे. सोबतच कापसाचे बोंडे देखील भिजल्याने खाली पडली आहेत. यामुळे कापूस वेचणी करणे देखील मुश्किल झाले असून आता कापूस बोंडे सडली आहेत.
पीक नुकसानीनंतर ३ दिवसांत पीक नुकसानीची तक्रार करणे आवश्यक असते. त्यासाठी शेतकरी वर्ग तक्रार देण्यासाठी कॉल करत आहेत. पण कंपनीचा कॉल नॉट रिचेबल येत आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत. त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनीधी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी करतील असे शेतकऱ्यांना वाटत होते. पण तसे झाले नाही. जिथे फोन लागतच नाही, तिथे काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न सध्या शेतकरी वर्गासमोर आहे.
दरम्यान, कंपन्यांकडून पीक नुकसानीची दखल घेतली जात नसल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे पीक विम्याच्या घोषणा हवेतच विरत असल्याचं चित्र सर्वांना पाहायला मिळत आहे. विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचं आणि सरकारचं दोघांचं ऐकत नसल्याचं चित्र असल्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख्यांनी म्हटलं आहे.
Published on: 01 December 2023, 12:18 IST