News

मुंबई: तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची देय असलेली रक्कम पणन महासंघाने तातडीने द्यावी असे स्पष्ट निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले. हंगाम 2018-19 मधील हमीभावाने मूग, उडीद व सोयाबीनच्या खरेदी संदर्भातील पूर्व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

Updated on 10 October, 2018 9:53 PM IST


मुंबई:
तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची देय असलेली रक्कम पणन महासंघाने तातडीने द्यावी असे स्पष्ट निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले. हंगाम 2018-19 मधील हमीभावाने मूग, उडीद व सोयाबीनच्या खरेदी संदर्भातील पूर्व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसेवखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपेनाफेडच्या श्रीमती भव्या आनंद तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हंगाम 2016-17 मध्ये राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची ई ऑक्शनद्वारे विक्री व विविध योजनांमध्ये पुरवठा करण्यात येणारी भरडाईसाठी निर्गमित तूर, शासनाच्या विविध विभागाअंतर्गत तूरडाळ पुरवठा, हरभरा खरेदी अनुदान, मूग, उडीद,सोयाबीन हमीभावाने खरेदी संदर्भात सद्यस्थिती आदी विषयांबाबत मंत्री महोदयांनी आढावा घेतला. तसेच राज्यात उपलब्ध असलेल्या गोदामांचे योग्य नियोजन आणि खरेदी केंद्र व गोदाम यांच्यातील अंतर याचाही विशेष आढावा पणनमंत्र्यांनी यावेळी घेतला. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खरेदी  केलेल्या मालाचे पैसे तातडीने द्यावेत. चालू हंगामात उपलब्ध गोदामाच्या जवळपास खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत प्राधान्याने विचार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तूरडाळ व हरभरा खरेदी सद्यस्थिती

राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करुन तूरडाळ शासनाच्या विविध योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात येत आहे. 5 ऑक्टोबर2018 अखेर एकूण तूरसाठा 25.25 लाख क्विंटल तसेच भरपाईसाठी दिलेली तूर 8.77 लाख क्विंटल, ई ऑक्शनद्वारे विक्री केलेली तूर 6.40 लाख क्विंटल, एकूण निर्गमित केलेली तूर 15.17 लाख क्विंटल तर शिल्लक तूर 10.08 लाख क्विंटल आहे. शासनाच्या विविध विभागाअंतर्गत मागणीनुसार 5 लाख 51 हजार 117.49 क्विंटल तूरडाळ पुरवठा करण्यात आली.

आतापर्यंत 1 लाख 39 हजार 248 शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्यात आलेला आहे. तूर व हरभरा या पिकांचे सन 2017-18 मधील शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे संपूर्ण चुकारे अदा केल्यानंतर खरेदी न झालेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे नियोजन केलेले आहे अशी माहिती डॉ. योगेश म्हसे यांनी या बैठकीत दिली.

ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ

हंगाम 2018-19 मध्ये मूग, उडीद व सोयाबीन संदर्भात नाफेडने 157 खरेदी केंद्र मंजूर केली आहेत. त्याठिकाणी मुगासाठी आधारभूत प्रति क्विंटल दर 6 हजार 975 रुपये असून चार लाख क्विंटल खरेदी राज्य शासनाने प्रस्तावित केले आहे. उडिदासाठी 5 हजार 600 प्रतिक्विंटल दर असून 3.50 लाख क्विंटल खरेदी व सोयाबीनसाठी 3 हजार 399 प्रतिक्विंटल दर असून 25 लाख क्विंटल खरेदी प्रस्तावित आहे. मूग व उडीद शेतकरी नोंदणीची मुदत 24 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. मूग व उडिदाची खरेदी 11 ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार आहे.

संबंधित बातमी वाचण्यासाठी: हमीभावाने मूग, उडीद नोंदणीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

राज्यात दिनांक 9 ऑक्टोबर अखेर 12 हजार 721 उडीदासाठी, 8 हजार 914 मुगासाठी तर 7 हजार 279 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीकरिता नोंदणी झालेली आहे. सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर खरेदी सुरु करण्यात येईल, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली. शेतकऱ्यांना माल खरेदीबाबत एसएमएस आल्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या दिवशीच आपला माल संबंधित खरेदी केंद्रावर घेऊन जाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीस मार्केटिंग फेडरेशनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पोहीनकर, डॉ.अतुल नेरकर, महाव्यवस्थापक कल्याण कानडे, शिवाजी ठोंबरे, अनिल देशमुख व विभागाचे इतर अधिकारी उप‍स्थित होते.

English Summary: instructions for due amount of pigeon pea and chick pea immediate pay to farmers
Published on: 10 October 2018, 09:46 IST