बुलडाणा: जिद्द आणि कष्टाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीचे बुरुज ढासळतात हे एका शेतकरी पुत्राने आपल्या अलौकिक कामगिरीतून सिद्ध केले आहे. राजू केंद्रे याची लंडन विद्यापीठात अग्रमानांकित चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारेचा तो रहिवाशी आहे. कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना जगभरातील १६० देशातील विद्यार्थ्यांमधून पात्र होण्याची किमया राजूने साधली आहे.
लंडन विद्यापीठाची चेवनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाते. या शिष्यवृत्तीसाठी जगभरातील विद्यार्थी अर्ज करतात. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाजात अमुलाग्र बदल घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची विविध पात्रता चाचण्यांमधून निवड केली जाते. साधारण ४५ लाख रुपये शिष्यवृत्तीची रक्कम आहे.
'एकलव्या'ची साधना:
एकलव्याच्या एकनिष्ठ साधनेप्रमाणे राजू याची शैक्षणिक कारकीर्द राहिली आहे. राजू याने मुक्त विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 'टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स'मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन २०१७ ते २०१८ या कालावधीसाठी मुख्यमंत्री फेलोशिप साठी पात्र ठरला. मेळघाट, ग्रामपरिवर्तन, मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय, आयपॅक यासर्व प्रक्रियेतून राजू याची सर्वांगीण जडणघडण झाली.
'लोकल ते ग्लोबल':
आई-वडिलांनी शेतात कष्ट करुन शिकवले. नवे स्वप्न दिले. त्यामुळे 'लोकल ते ग्लोबल' भरारी घेणे शक्य झाल्याचे राजू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये कष्ट घेण्याची क्षमता रक्तातच असते. कष्टाला योग्य दिशा दिल्यास नक्कीच उज्ज्वल भविष्य घडू शकेल आणि शेतीवरील भार देखील कमी होईल असा विश्वास राजू याने व्यक्त केला आहे.
Published on: 06 July 2021, 09:37 IST